केंद्रीय करारातून धोनीला वगळले!

0
126

>> खलील अहमद, दिनेश कार्तिक व अंबाती रायडूलादेखील स्थान नाही

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गुरुवारी ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी केंद्रीय करारबद्ध खेळाडूंची यादी काल गुरुवारी जाहीर केली. या यादीत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यासह डावखुरा जलदगती गोलंदाज खलील अहमद, यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक तसेच मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायडू या मागील केंद्रीय करारात स्थान असलेल्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

मागील करारात धोनी ‘अ’ श्रेणी (५ कोटी) होता. आघाडी फळीतील फलंदाज लोकेश राहुल याला ‘ब’ श्रेणीतून ‘अ’ श्रेणीत बढती देण्यात आली आहे. मेलबर्न येथे कसोटी पदार्पण करून प्रभाव पाडलेला कसोटी सलामीवीर मयंक अगरवाल याला थेट ‘ब’ श्रेणीत जागा मिळाली आहे. दुखापतीमुळे मागील करारात ‘क’ श्रेणीत अवनती झालेला यष्टिरक्षक फलंदाज वृध्दिमान साहा ‘ब’ श्रेणीत परतला आहे. नवदीप सैनी, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यर व वॉशिंग्टन सुंदर यांनी ‘क’ श्रेणीसह करारबद्ध खेळाडूंच्या यादीत स्थान मिळविले आहे. मागील वेळेस करारबद्ध खेळाडूंच्या यादीत २९ खेळाडूंचा समावेश होता तर यावेळी केवळ २७ खेळाडू करारबद्ध आहेत.

करारबद्ध खेळाडू ः श्रेणी अ प्लस (७ कोटी) ः विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, श्रेणी अ (५ कोटी) ः रविचंद्रन अश्‍विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्‍वर कुमार, चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, कुलदीप यादव, ऋषभ पंत, लोकेश राहुल, श्रेणी ब (३ कोटी) ः उमेश यादव, युजवेंद्र चहल, हार्दिक पंड्या, वृध्दिमान साहा व मयंक अगरवाल, श्रेणी क (१ कोटी) ः केदार जाधव, मनीष पांडे, हनुमा विहारी, नवदीप सैनी, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यर व वॉशिंग्टन सुंदर.