नवी दिल्ली
आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नसून केंद्रात सत्ता परिवर्तन होणार आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाची खुर्ची जाणार आहे, असे भाकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे. एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमातील मुलाखतीवेळी पवार यांनी या विषयावर काल भाष्य केले. देशात महायुतीचे सरकार येण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
आपण नरेंद्र मोदी यांना कधीही पाठिंबा देणार नाही असे वक्तव्यही पवार यांनी यावेळी केले. २००४ प्रमाणेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही कोणत्या एका पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचा दावा त्यांनी केला.
दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखे नरेंद्र मोदी यांचे व्यक्तीमत्व नसल्याची टिप्पणीही त्यांनी केली. आपण पंतप्रधान होण्यास इच्छुक नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात आपली भूमिका महत्वाची राहणार असल्याचे सुतोवाच पवार यांनी केले.