>> पुत्र योगीराजने स्वकर्तृत्वावर राजकारणात यावे
मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी केंद्रात जाण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्रात जाणार ही नुसती अफवा आहे. मला केंद्रात येण्याची कुणीही ऑफर दिलेली नाही व आपणही तशी मागणी कुणाकडे केलेली नाही असे काल पत्रकार परिषदेत बोलताना आमदार कामत यांनी सांगितले.
आपला पुत्र योगीराज याला मडगावातून यापुढे निवडणुकीत उभे करणार का असे विचारता, राजकारणात प्रत्येकाने आपला मार्ग शोधण्याची गरज आहे. योगीराज निवडणुकांमध्ये सहकार्य करीत आहे. आता त्याच्या कार्यावर व मडगाववासीयांच्या मागणीवर त्याचा पुढील मार्ग ठरेल. राजकारणात प्रत्येकाने आपल्या हिमतीवर प्रवेश करायचा असतो. योगीराजलाही तेच तत्व लागू असल्याचे सांगितले.
मंत्रिमंडळाबाबत
मुख्यमंत्र्यांना माहिती
कर्नाटकांत विधानसभा निवडणुकीपूर्वी गोव्यात मंत्रिमंडळात बदल होणार असे संकेत दिले होते त्याबद्दल कामत यांना प्रश्न विचारला त्यांनी, त्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा आहे. गोव्यात बदल होणार की नाही हे मुख्यमंत्र्यांनाच माहीत असेल असे आमदार कामत यांनी सांगितले.