भाजपचे रोखठोक वक्तव्यासाठी प्रसिध्द असलेले खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी काल येथील एका कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून बोलताना आपल्या टीकेचे लक्ष्य थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले. मोदी सरकारमधील मंत्री म्हणजे खुशामतखोरांचा कंपू असून त्यांच्यापैकी ९० टक्के लोकांना कोणी ओळखतही नाही असा टोला त्यांनी लगावला.
जीएसटी, नोटाबंदी या विषयांवर आपण भाष्य करीत असल्याप्रकरणी आपल्यावर होणार्या टीकेचाही सिन्हा यांनी खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, जर एक वकील वित्त मंत्री बनतो, एक टीव्ही अभिनेत्री मनुष्यबळ विकास मंत्री बनते आणि चहाविक्या… (अप्रत्यक्षपणे पंतप्रधान मोदी)… बनतो तर मी वरील विषयांवर का बोलू शकत नाही असा सवाल त्यांनी केला. जेडीयुचे खासदार अली अन्वर यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी बोलताना त्यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली. यावेळी व्यासपीठावर जेडीयूचे नेते खासदार शरद यादव तसेच माकप नेते सीताराम येच्युरी हेही उपस्थित होते.
केंद्रातील सरकार म्हणजे ‘वन मॅन आर्मी’ (मोदी) व ‘टू मॅन शो’ (मोदी व अमित शहा) अशी टिप्पणी सिन्हा यांनी केली. आज सत्ता पक्षातील स्थिती अशी आहे की तुम्ही एखाद्या नेत्याला पाठिंबा दिला नाही तर तुम्ही राष्ट्रविरोधी ठरता. सध्या सरकार चालवणार्यांचा सूर ‘ना जिऊँगा ना जीने दूंगा’ अशा पध्दतीचा आहे. या सरकारमधील ९० टक्के मंत्र्यांना कोणी ओळखतही नाही. हे मंत्री म्हणजे खुशामतखोरांचा कंपू आहे अशी संभावना सिन्हा यांनी केली. केंद्रात मंत्रिपद मिळाले नसल्याने आपण नाराज असल्याविषयीच्या टीकेचे त्यांनी जोरदारपणे खंडन केले. आपल्याला तशी अपेक्षाही नव्हती असे त्यांनी स्पष्ट केले.