केंद्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून

0
67

केंद्रातील मोदी सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आज प्रारंभ होत असून यावेळी सरकारपक्ष तिहेरी तलाक विधेयक संमतीसाठी पुन्हा एकदा निकराचा प्रयत्न करणार आहे. मात्र विरोधकांकडून त्याला जोरदार विरोध केला जाण्याची शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करीत आहेत.

या अधिवेशनाची सुरुवात लोकसभा व राज्यसभा सदस्यांच्या संयुक्त उपस्थितीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने होणार आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर देशाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल पटलावर मांडण्यात येणार आहे.
तर १ फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा पूर्णस्वरूपी अर्थसंकल्प वित्तमंत्री अरूण जेटली सादर करणार आहेत. या अधिवेशनाचा पहिला टप्पा ९ फेब्रुवारीला संपणार असून संसदेचे अधिवेशन पुन्हा ५ मार्चला सुरु होऊन ते ६ एप्रिलपर्यंत चालणार आहे.

राजकीय निरीक्षकांच्या मते यंदाचा अर्थ संकल्प प्रामुख्याने आगामी २०१९च्या लोकसभा निवडणुकांवर लक्ष ठेवून आखला जाणार आहे. त्यात शेतकरी व गरीबांवर भर देत मतदारांना एक संदेश देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल असा अंदाज आहे.
या अधिवेशनात विरोधक सत्ताधार्‍यांना अनेक मुद्द्यांवरून घेरण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चे दरम्यान बेरोजगारी, जातीय संघर्ष, शेतकर्‍यांमधील असंतोष यासह अन्य काही मुद्द्यांचाही विरोधक वापर करणार आहेत.