भांडवली गुंतवणुकीसाठी केंद्र सरकारने गोव्याला 386 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर केले आहे. 2023-24 ह्या वर्षासाठी राज्यांसाठीची विशेष भांडवली गुंतवणूक ह्या योजनेखाली हे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
राज्यांच्या भांडवली गुंतवणुकीला चालना देण्यासाठी केंद्राने ही योजना सुरू केली आहे. या योजनेखाली केंद्र सरकारने एकूण 16 राज्यांना 56,415 कोटी रुपये एवढा निधी भांडवली गुंतवणुकीसाठी मंजूर केला आहे.
या योजनेखाली राज्यांना आरोग्य, शिक्षण, जलसिंचन, पाणीपुरवठा, वीज, रस्ते, पूल व रेल्वे या क्षेत्रातील प्रकल्पांसाठी निधी मंजूर केलेला आहे. केंद्र सरकारने आपल्या 2023-24 च्या अर्थसंकल्पातून राज्यांना 50 वर्षांसाठी व्याजमुक्त कर्ज विशेष मदतीच्या रुपात देण्याची घोषणा केली होती, त्यासाठी केंद्र सरकारने 2023-24 ह्या आर्थिक वर्षासाठी 1.3 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे.