कॅसिनो आग्वादला हलविण्यावर मुख्यमंत्र्यांशी आज/उद्या चर्चा

0
101

>> मंत्री मायकल लोबो यांची माहिती

तरंगते कॅसिनो मांडवीतून आता आग्वाद खाडीत हलवण्यासाठीच्या हालचाली सरकारी पातळीवर सुरू झालेल्या असून मंत्री मायकल लोबो हे पणजीचे मदार बाबुश मोन्सेर्रात यांच्यासह आज मंगळवारी अथवा उद्या बुधवारी या प्रश्‍नावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करणार आहेत.

काल यासंबंधी मंत्री मायकल लोबो हे माहिती देताना म्हणाले की मांडवी नदीत पणजीच्या दिशेने असलेल्या सहा कॅसिनोंपैकी एका कॅसिनो मालकाने आपले कॅसिनो जहाज आग्वाद खाडीत हलवण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे अन्य कॅसिनो मालकही आपली जहाजे हलवण्यास राजी होतील, असे दिसत असल्याचे ते म्हणाले.
या प्रश्‍नावर आपण व बाबुश मोन्सेर्रात हे आज मंगळवारी अथवा उद्या बुधवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत. मुख्यमंत्र्यांबरोबरच्या चर्चेत काय ठरते त्यावर पुढील सगळे काही अवलंबून असेल, अशी माहिती त्यानी दिली. या प्रश्‍नावर मुख्यमंत्र्याशी यापूर्वी चर्चा झाली होती का, असे विचारले असता नाही असे उत्तर त्यानी दिले.

मुख्यमंत्र्यांकडून कॅसिनो जहाजे आग्वाद खाडीत हलवण्यासाठी हिरवा कंदिल मिळाल्यानंतर प्रत्यक्ष आग्वाद येथे जाऊन ही जहाजे नक्की कुठे नांगरून ठेवणे शक्य आहे त्याची पाहणी करण्यात येणार असल्याचे लोबो यांनी सांगितले.