>> काही रेल्वे रद्द; तर काही कोकण रेल्वे मार्गावर वळवल्या
कॅसलरॉक ते करंझोळ रेल्वे मार्गावर मंगळवारी संध्याकाळी मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने या मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे वास्को रेल्वे स्थानकावर येणाऱ्या काही रेल्वे तात्पुरत्या रद्द केल्या आहेत. या रेल्वे हुबळी आणि बेळगाव स्थानकावर थांबणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी 6 च्या सुमारास कॅसलरॉक ते करंझोळ रेल्वे मार्गावर मोठी दरड कोसळली. त्यामुळे वास्को रेल्वे स्थानकावर येणाऱ्या व येथून विविध ठिकाणी जाणाऱ्या काही रेल्वे गाड्या तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या.
कॅसलरॉक येथे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाल्याने अनेक गाड्या कोकण रेल्वे मार्गावर वळवण्यात आल्या, तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या. तसेच तिकिट रद्द केलेल्यांना तिकिट रक्कम परत करण्याचे काम सुरू झाले आहे. तसेच ढिगारा साफ करून मार्ग पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, त्यासाठी 5 जेसीबी व 100 कामगार कार्यरत असल्याचे दक्षिण पश्चिम रेल्वेचे अधिकारी अनिश हेगडे यांनी सांगितले.
दरड कोसळल्याने रेल्वेंच्या मार्गात बदल
गुरुवार दि. 27 रोजी वास्को रेल्वे स्थानकावरून पश्चिम बंगाल, हावडा येथील शालिमार रेल्वे स्थानकावर प्रवाशांना घेऊन जाणारी रेल्वे वास्कोऐवजी हुबळी येथून प्रवाशांना घेऊन निघणार आहे. तसेच गुरुवार व शुक्रवारी वास्कोहून सुटणारी दिल्ली येथील हजरत निझामुद्दीन रेल्वे आता बेळगाव येथून घेऊन निघणार आहे, अशी माहिती रेल्वेकडून प्राप्त झाली.