कॅरेबियन दिग्गज सर एव्हर्टन वीक्स कालवश

0
114
  • सुधाकर रामचंद्र नाईक

१९४० ते ५० या दशकात जागतिक क्रिकेटवर आधिपत्य गाजविलेल्या वेस्ट इंडीजच्या प्रख्यात ‘थ्री डब्ल्यू’ त्रिकुटात समाविष्ट असलेल्या वीक्स यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग पाच शतकांचा विक्रम तसेच सर डोनाल्ड ब्रॅडमन यांच्याहून जलद १००० कसोटी धावांचा संयुक्त विश्‍वविक्रमही नोंदवला होता.

वेस्ट इंडीजचे महान फलंदाज सर एव्हर्टन वीक्स (९५) यांचे नुकतेच वृद्धापकाल तथा आजाराने निधन झाले. १९४० ते ५० या दशकात जागतिक क्रिकेटवर आधिपत्य गाजविलेल्या वेस्ट इंडीजच्या प्रख्यात ‘थ्री डब्ल्यू’ त्रिकुटात समाविष्ट असलेल्या वीक्स यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग पाच शतकांचा विक्रम तसेच सर डोनाल्ड ब्रॅडमन यांच्याहून जलद १००० कसोटी धावांचा संयुक्त विश्‍वविक्रमही नोंदवला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण केलेल्या क्लाइव्ह वॉलकॉट, फ्रँक वॉरेल आणि एव्हर्टन वीक्स या कॅरेबियन त्रिकुटाला ‘थ्री डब्ल्यू’ असे संबोधले जात असे.

२६ फेब्रुवारी १९२५ रोजी बार्बाडोस येथे जन्मलेल्या एव्हर्टन वीक्स यांना केवळ वेस्ट इंडीजचेच नव्हे तर जागतिक क्रिकेटमधील महान फलंदाज म्हणून ओळखले जाते. त्यांचा सलग पाच कसोटी शतके आणि जलद १ हजार कसोटी धावांचा संयुक्त विक्रम आजही अबाधित आहे. १९४८ मध्ये स्वगृही इंग्लंडविरुद्धच्या अंतिम कसोटीत १४१ आणि नंतर भारत दौर्‍यात १२८, १९४, १६२ आणि ११० अशा धावा नोंदण्याचा अजोड पराक्रम वीक्स यांनी नोंदला. पुढील कसोटीत त्यांना ९० वर धावचित देण्यात आले, अन्यथा सलग शतकांच्या षटकाराचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदला गेला असता.
२१ जानेवारी १९४८ रोजी जमैका येथे २२ वर्ष ३२९ दिवस या वयात वीक्स यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण केले. या कसोटीत वेस्ट इंडीजतर्फे सात तर इंग्लंडतर्फे पाच क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. या अनिर्णित कसोटीत तिसर्‍या क्रमांकावर उतरविलेल्या वीक्स यांनी ३५ व २५ अशा धावा केल्या. पुढील दोन कसोटीत असफल ठरल्याने चौथ्या कसोटीत त्यांना वगळण्यात आले. पाचव्या कसोटीत ग्रेगरी हेडली जायबंदी झाल्याने वीक्स यांना संघात पुनरागमन करण्याची संधी मिळाली आणि तिचे सोने करताना तडाखेबंद १४१ धावा ठोकीत त्यांनी आपले पहिले कसोटी शतक झळकविले. या शतकी कामगिरीमुळे वीक्स यांची नोव्हेंबर १९४८ मधील भारत, पाकिस्तान, सीलोन या आशियाई दौर्‍यासाठी निवड झाली. कॅरेबियन संघाचा हा पहिलाच भारत दौरा आणि वीक्स यांनी तो संस्मरणीय ठरविताना दिल्लीतील पहिल्या कसोटीत १२८, मुंबईत १९४ आणि कोलकातामधील तिसर्‍या कसोटीत १६२ व १०१ धावा ठोकीत सलग पाच कसोटीत शतकांचा विक्रम नोंदवला. या कामगिरीसह त्यांनी जॅक फिंगलटन आणि ऍलन मेलाबल यांचा विक्रम मोडला. मद्रासमधील चौथ्या कसोटीत त्यांना ९० धावांवर वादग्रस्तरीत्या पायचित देण्यात आले. मुंबईतील पाचव्या व अंतिम कसोटीत त्यांनी ५६ व ४८ धावा केल्या. नंतर सीलोनविरुद्धच्या अनधिकृत कसोटीत शतक आणि पाकिस्तानविरुद्ध अर्धशतक नोंदवले. आशियाई दौर्‍यातील बहारदार कामगिरीसह वीक्स यांनी ९ कसोटीतील केवळ १२ डावांत ८२.४६ च्या सरासरीने जलद १००० धावा नोंदण्याचा विक्रम नोंदवला. इंग्लंडचे हबर्ट सटक्लिफ आणि वीक्स यांच्या नावांवर हा संयुक्त विक्रम आहे. ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डोनाल्ड ब्रॅडमन यांच्याहून एका कमी डावाने त्यांनी हा संयुक्त विक्रम नोंदवला आहे.

१९५० मधील इंग्लंड दौर्‍यात वीक्स यांनी ५६.३३ च्या सरासरीने ३३८ धावा नोंदवीत वेस्ट इंडीजच्या (३-१) कसोटी मालिका विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
१९५१-५२ मधील ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलँड दौर्‍यात एव्हर्टन यांना दुखापतींचा सामना करावा लागला. विशेषत: ऑस्ट्रेलियन तेज गोलंदाज रे लिंडवेल यांच्या वादग्रस्त ‘बॉडीलाइन’ गोलंदाजीमुळे ते दुखापतींचे शिकार ठरले.

१९५२-५३ मधील भारतीय संघाच्या कॅरेबियन दौर्‍यात वीक्स यांनी पोर्ट ऑफ स्पेन कसोटीत ग्रेगरी हेडली यांचा जलद २१९० कसोटी धावांचा विक्रम मोडला. नंतर कॅरेबियन राष्ट्रीयसाथी गॅरी सोबर्स यांनी १९६६ मध्ये त्यांचा हा विक्रम मोडला.

१९५४ मध्ये एव्हर्टन यांनी वॉरेल यांच्या साथीत इंग्लंडविरुद्ध ३३८ धावांच्या भागीचा विक्रम नोंदला. १९५६ मध्ये एव्हर्टन यांनी न्यूझिलँडविरुद्ध सलग तीन शतकांचा आणखी एक पराक्रम नोंदवला.

३१ मार्च १९५८ रोजी पाकिस्तानविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळलेल्या एव्हर्टन यांनी आपल्या दशकभराच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ४८ कसोटीत ५८.६१ च्या सरासरीने १५ शतके आणि १९ अर्धशतकांसह ४,४४५ धावा नोंदल्या. दुखापतीमुळे घेतलेल्या आंतरराष्ट्रीय निवृत्तीनंतरही १९६४ पर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सक्रिय राहिलेल्या वीक्स यांनी १५२ प्रथम श्रेणी सामन्यांत ३६ शतके आणि ५४ अर्धशतकांसह १२,०१० धावा नोंदल्या. कसोटी क्रिकेटमध्ये २०७ आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये नाबाद ३०४ ही त्यांची वैयक्तिक सर्वोच्च खेळी होय. सर जॉर्ज हेडलीसह वेस्ट इंडीजच्या दोन महान फलंदाजांत गणना असलेल्या वीक्स यांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील टॉप १० फलंदाजांतही समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट संन्यासानंतर बार्बाडोस गव्हर्नमेंटने एव्हर्टन यांची क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती केली. त्यांच्या बहुमूल्य मार्गदर्शनाचा अनेक नामवंत खेळाडूंना लाभ झाला. बार्बाडोस क्रिकेट असोसिएशनशी ते बरीच वर्षे संलग्न होते. इंटरनॅशनल मीडियाचे क्रिकेटविश्‍लेशक म्हणूनही त्यानंी रेडिओ तसेच टीव्हीवर योगदान दिले.

१९७९ मधील आयसीसी विश्‍वचषक स्पर्धेत सर एव्हर्टन यांनी कॅनेडियन संघाचे प्रशिक्षकपद भूषविले.
१९९४ मध्ये सर एव्हर्टन यांची आयसीसी मॅच रेफ्री म्हणून नियुक्ती झाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोच्च ‘आयसीसी हॉल ऑफ फेम’ किताबानेही त्यांना गौरविण्यात आले.

वीक्स यांनी आपल्या क्रिकेट स्मृतीना उजाळा देणारे ‘टेन ईयर्स ऑफ वीक्स, १९४८ टू १९५८’ हे आत्मचरित्र २००७ मध्ये प्रसिद्ध केले. वेस्ट इंडीज विद्यापीठातर्फे या पुस्तकाचा समावेश महाविद्यालयीन अभ्यासक्रमात केला. सर एव्हर्टन यांनी क्रिकेट व्यतिरिक्त बार्बाडोस सरकारच्या पोलिस सर्व्हिस कमिशनसह विविध संस्थांतही योगदान दिले. वीक्स यांचा चुलतबंधू केनेथ वीक्स आणि मुलगा डेविड मरे वेस्ट इंडीजतर्फे कसोटी क्रिकेट खेळले. त्यांचा नातू रिकी हॉयटे बार्बाडोसतर्फे तर पुतण्या डोनाल्ड वीक्स ससेक्सतर्फे प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले.
कॅरेबियन क्रिकेट तसेच विविध संस्था/संघटनांसाठी आयुष्यभर योगदान दिलेले सर वीक्स यांना जून २०१९ मध्ये हृदयविकाराचा झटका आला होता. अखेर गेल्या १ जुलै २०२० रोजी त्यांचे निधन झाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भरीव योगदान दिलेल्या या दिग्गजाला अखेरचा सलाम!