राज्यांचे मुख्यमंत्री बदलण्याची सध्या जी मालिका चालली आहे, त्यामध्ये भाजपने उत्तराखंड, कर्नाटक आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना पायउतार केले, तर कॉंग्रेसने पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर पदत्याग करण्याची वेळ आणली. देशामध्ये मोदी लाट असतानाही ज्यांनी पंजाबमध्ये एकहाती कॉंग्रेसची सत्ता आणली आणि प्रतिकूल परिस्थितीतही पक्षाचा झेंडा फडकता ठेवला, त्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर ज्याप्रकारे मानहानीकारकरीत्या राजीनामा देण्याची वेळ आली आहे, त्यातून कॉंग्रेसमध्ये सध्या कोणत्या प्रकारचे राजकारण चालले आहे त्याची चाहुल मिळते.
कॅप्टन अमरिंदर आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील संघर्षाची जरी ह्या राजीनाम्याला पार्श्वभूमी असली, तरी गांधी कुटुंबाने म्हणजेच सध्या सोनिया गांधींच्या वतीने पक्षाची सूत्रे हलविणार्या राहुल – प्रियांकाने ज्या प्रकारे अमरिंदर यांच्या आजवरच्या योगदानाकडे कानाडोळा करीत सिद्धू यांचीच पाठराखण चालवली आहे, त्यातून कॅप्टन अमरिंदर यांचे पक्षातील वाढते स्थान राहुल – प्रियांकाला मानवत नाही हेच सिद्ध झाले आहे.
अमरिंदर आणि सिद्धू यांच्यातील वाद काही नवा नाही. मुळात सिद्धू यांना २०१७ च्या निवडणुकीच्या तोंडावर पक्षात घ्यायला अमरिंदर यांचा विरोध होता. परंतु तो डावलून त्यांना पक्षात आणले गेले. कॅबिनेट मंत्री करायला भाग पाडले गेले. सिद्धूंच्या महत्त्वाकांक्षेला राहुल – प्रियांकांच्या पाठबळामुळे पंख फुटत राहिले. उपमुख्यमंत्रिपदासाठी त्यांनी मोर्चेबांधणी केली. अमरिंदर यांनी सिद्धूंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली तरीही सिद्धूंची आक्रमकता कायम राहिली. सिद्धूंच्या पाकिस्तानप्रेमाबाबत अमरिंदरसिंग यांनीही वेळोवेळी प्रश्न उपस्थित केले. गेल्या जुलैमध्ये अमरिंदर यांचा विरोध डावलून पंजाब प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षपद दिले गेले, परंतु तरीही सिद्धूंची विरोधी मोहीम सुरूच राहिली. कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेऊनही काही उपयोग झाला नाही. त्यामुळे ह्या मानहानीने व्यथित होऊन आपण राजीनामा देत असल्याचे सांगत अमरिंदरसिंग पायउतार झाले आहेत.
पंजाबमध्ये गोव्यासोबत येत्या फेब्रुवारीत विधानसभा निवडणूक व्हायची आहे. एकीकडे अकाली दल – बसप युती आणि दुसरीकडे आप तसेच भाजपशी सामना आहे. अशा वेळी अमरिंदरसिंग यांची मवाळ नीती चालणारी नाही. त्यासाठी सिद्धूंसारखा आक्रमक वक्तृत्व असलेला नेताच हवा असा असेही कॉंग्रेस नेतृत्वाला वाटले. परंतु त्यांना मुख्यमंत्रिपदी आणले तर आपण ते कदापि स्वीकारणार नाही असे जाता जाता अमरिंदर यांनी जाहीर केल्याने या पुढील परिणामांची शक्यता लक्षात घेऊन सिद्धू यांच्याऐवजी दुसरे नाव मुख्यमंत्रिपदासाठी जरी पुढे केले गेले असले तरी सिद्धू यांचाच प्रभाव आगामी निवडणूक प्रचारकाळात राहणार आहे असे दिसते.
कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या सरकारवर सिद्धूंनी आजवर सतत निशाणा साधला. त्यांचे सरकार निष्क्रिय आहे असे म्हणण्यासही त्यांनी कमी केले नाही. अकाली दलाविरुद्ध कारवाई करण्यास अमरिंदर धजावत नाहीत असे वातावरणही त्यांनी निर्माण केले. अमरिंदर यांचे पक्षांतर्गत विरोधकही तसे कमी नाहीत. त्यामुळे त्यांच्या विरोधकांनी निरीक्षकांचे काम फुंकत त्यांच्या आजवरच्या योगदानाला नजरेआड करीत बळी दिले आहे. अर्थात, कॅप्टन अमरिंदरही कच्च्या गुरूचे चेले नाहीत. स्वतः फौजी असल्याने लढणे हा त्यांचाही बाणा आहे. परंतु सध्याच्या अपमानास्पद परिस्थितीत ते कोणती भूमिका स्वीकारतात आणि त्यांना पक्षातून आमदारांचा किती पाठिंबा मिळतो यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. कॉंग्रेसमध्ये अंतर्गत सुंदोपसुंदी काही नवी नाही. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, कर्नाटक, पंजाब असे सर्वत्र हे संघर्ष वेळोवेळी उफाळत राहिले आहेत. परंतु निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचा पक्षांतर्गत संघर्ष एवढ्या थराला जाणे हे निश्चितच पक्षप्रतिमेला मारक आहे. भाजपाने आपल्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीचा हिशेब मांडून काहींना सत्तेवरून उतरवले, परंतु पक्षनेतृत्वाविरुद्ध आवाज उठवण्याची कोणाची टाप नाही. परंतु कॉंग्रेसचे तसे नाही. कॅप्टन अमरिंदर मुकाटपणे आपला अपमान सोसून गप्प राहण्याची शक्यता नाही. विशेषतः गेल्या विधानसभा, लोकसभा, पंचायत आणि पालिका निवडणुकांतील आपल्या नेतृत्वाखालील कामगिरी दिमाखदार असतानाही पक्षनेतृत्व आपल्या पाठीशी राहिले नाही हा घाव त्यांच्या जिव्हारी लागलेला आहे. कॉंग्रेसमधील नव्या युवा नेतृत्वाची एकूण कार्यशैली त्यांना आणि देशाला ह्या प्रसंगातून दिसली आहे आणि ती काही फारशी परिपक्व दिसत नाही.