गोवा टेबल टेनिस संघटनेतर्फे त्यांच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्त्य साधून १४ ते १९ डिसेंबरपर्यंत ७९व्या कॅडेट, उपकनिष्ठ राष्ट्रीय आणि आंतरराज्य टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा भारतीय टेबल टेनिस महासंघाच्या अधिपत्याखाली ताळगाव येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इंडोअर स्टेडियममध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती, काल गोवा टेबल टेनिस संघटनेतर्फे बांबोळी बीच रिसॉर्टमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
३२ राज्यातून कॅडेट व उपकनिष्ठ मुला-मुलींच्या विभागात एकूण १२० संघ सहभागी होणार आहेत. कॅडेट मुलांच्या एकेरीत १९४, कॅडेट मुलींच्या एकेरीत १६७, उपकनिष्ठ मुलांच्या विभागात २२२ तर उपकनिष्ठ मुलींच्या विभागात २०७ पॅडलर्सनी आपला प्रवेश निश्चित केला आहे. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण रु. ५ लाखांची रोख बक्षिसे व चषके दिली जातील. स्पर्धेसाठी रु. ७५ लाख एकूण खर्च अपेक्षित असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली आहे.
स्पर्धेत पुढील प्रमाणे गोमंतकीय खेळाडू सहभागी होणार आहेत ः कॅडेट मुलगे – शांतेश म्हापसेकर, आरव अय्यर, आरोन कुलासो व अद्वैत मुद्रास, कॅडेट मुली – स्नेहा मेस्त, सिमरन कुबल, तृषा हम्मनवार व अनुश्री नाईक, उपकनिष्ठ मुलगे – शांतेश म्हापसेकर, नागेश वेरेकर, जायझ गोम्स आणि निलय कामत, उपकनिष्ठ मुली – तानिया पाटील, सानिशा शेट्ये, आदिती चोडणकर व स्नेहा मेस्त. प्रशिक्षकाची जबाबदारी दिलजीत वेलिंगकर व राया दयाल हे सांभाळणार आहेत.