‘कॅचिंग डस्ट’ सिनेमाने उघडणार इफ्फीचा पडदा

0
30

>> ‘फेदरवेट’ने होणार समारोप; केंद्रीय माहिती-प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती

यंदाच्या इफ्फीत ब्रिटिश चित्रपट ‘कॅचिंग डस्ट’ हा स्टुअर्ट गट्ट यांचा चित्रपट हा शुभारंभी चित्रपट असेल, तर अमेरिकी चित्रपट ‘फेदरवेट’ हा समारोपाचा चित्रपट असेल. ‘अबाऊट ड्राय ग्रासिस’ हा फ्रेंच चित्रपट मीड फिस्ट चित्रपट असेल, अशी माहिती काल केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या महोत्सवाच्या आंतरराष्ट्रीय विभागात 198 चित्रपट दाखवण्यात येतील. त्यापैकी 13 चित्रपटांचे इफ्फीमध्ये प्रिमियर होणार आहे. निमिर्ती, वितरण व विक्रीसाठी 300 चित्रपट प्रकल्प फिल्म बझारमध्ये उपलब्ध असतील.

विविध आघाडीच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार प्राप्त झालेल्या 19 चित्रपटांचाही इफ्फीत समावेश असेल. त्याशिवाय सुप्रसिद्ध फिल्म मेकर्स, अभिनेते, छायाचित्रकार आदींच्या 20 मास्टर क्लासेसचे आयोजन करण्यात येणार आहे. ओटीटीसाठी असलेल्या विशेष पुरस्कारांसाठी 15 ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 10 भाषांतील 32 चित्रपटांच्या प्रवेशिका आलेल्या आहेत. यंदाच्या इफ्फीत 270 पेक्षा जास्त चित्रपटांचे शो चार ठिकाणांवर होतील. आयनॉक्स पणजी, मॅकेनिज पॅलेस, आयनॉक्स पर्वरी, झेड् स्क्वेअर सम्राट अशोक अशा ठिकाणी हे शो होतील.
मास्टर क्लासेस, पॅनल डिस्कशन्स, तसेच उद्घाटन समारंभ व समारोप समारंभ हे बूक माय शो ॲपवरून माफक नोंदणी शुल्कात ऑनलाईन उपलब्ध असतील.

इंडियन पॅनोरमातील चित्रपट बहुभाषांमध्ये उपलब्ध असतील

इंडियन पॅनोरमातून दाखवण्यात येणारे विविध भारतीय भाषांतील चित्रपट हे प्रतिनिधींसाठी त्यांना पाहिजे त्या भाषेतून पाहण्यासाठी डबिंगची सुविधा उपलब्ध असेल. स्मार्टफोन व इअरफोनद्वारे ही सुविधा मिळवता येईल. त्यासाठी इफ्फीने सिनेडब्स ॲपशी सहयोग केला आहे.