कृष्णात खोत, प्रकाश पर्येकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार

0
8

साहित्य अकादमीकडून देशातील 24 भाषांमध्ये लेखन करणाऱ्या लेखकांचा पुरस्कार देऊन गौरव केला जातो. यंदाचा मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार कोल्हापुरातील कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ या कादंबरीला जाहीर झाला आहे. तसेच सुप्रसिद्ध कोकणी कथाकार डॉ. प्रकाश पर्येकर यांना त्यांच्या ‘वर्सल’ ह्या कथासंग्रहासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. 12 मार्चला या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्याला एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक आणि मानपत्र दिले जाते.

कृष्णात खोत हे रिंगाण या कादंबरीचे लेखक आहेत. त्यांनी त्यांच्या या कादंबरीमध्ये विस्थापितांच्या जगण्याचे चित्रण केले आहे.
डॉ. प्रकाश पर्येकर हे सत्तरी तालुक्यातील असून, येथील आपल्या साहित्यातून त्यांनी तेथील लोकजीवन उभे करतानाच तेथील लोकांच्या व्यथा आपल्या कथांतून समर्थपणे मांडण्याचे काम केलेले आहे.

हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर दै. ‘नवप्रभा’शी बोलताना डॉ. प्रकाश पर्येकर म्हणाले की, आपण ज्या सत्तरी तालुक्यात राहतो, तेथील गरीब व तळागाळातील लोकांची सुख-दु:खे, त्यांच्या व्यथा, त्यांनी भोगलेल्या हालअपेष्टा व त्यांचे एकूणच जीवन आपण आपल्या कथेतून मांडली आहे.

अंतिम यादीत होते दयाराम पाडलोसकरांचे पुस्तक
मराठी भाषेतून साहित्य अकादमी पुरस्कारासाठी 9 साहित्यिकांची पुस्तके स्पर्धेत होती. त्यात गोव्याचे साहित्यिक दयाराम पाडलोसकर यांचे ‘बवाळ’ ही लघुकथा सुद्धा अंतिम यादीत होती.