कृष्णविवराचे रहस्य उलगडणार; एक्सपोसॅट अवकाशात झेपावला

0
25

>> नववर्षाच्या पहिल्याच दिवशी इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण; कृष्णविवर, न्यूट्रॉनबाबत माहिती गोळा केली जाणार

काल नववर्षाचा पहिला दिवस. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अर्थात इस्रोने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठा इतिहास रचला. इस्रोने नव्या वर्षातील पहिली अंतराळ मोहीम सुरू केली असून, आपल्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपणही केले. इस्रोने काल सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी ‘एक्स-रे पोलारिमीटर सॅटलाईट’ (एक्सपोसॅट) याचे प्रक्षेपण केले. एक्सपोसॅट कृष्णविवराचे (ब्लॅक होल) चे रहस्य उलगडणार आहे.

एकावर्षापेक्षा कमी कालावधीत ब्रह्मांडाच्या शोधात भारताची ही तिसरी मोहीम आहे. 2023 मध्ये चांद्रयान-3 मिशनद्वारे चंद्रावर पोहोचल्यानंतर आणि आदित्य एल-1 मिशनद्वारे सूर्याकडे प्रवास सुरू केल्यानंतर इस्रोने यावर्षी अंतराळ क्षेत्रात पहिले पाऊल टाकले आहे. आता वर्ष 2024 च्या सुरुवातीला ब्रह्मांड आणि त्याच्याशी संबंधित कृष्णविवराबाबत माहिती मिळवण्याचा हेतू या मोहिमेमागे आहे.
नव्या वर्षातील पहिली अंतराळ मोहीम आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आली. एक्सपोसॅटच्या प्रक्षेपणामुळे, कृष्णविवर आणि न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी अवकाशात विशेष खगोलशास्त्र वेधशाळा पाठवणारा भारत हा जगातील दुसरा देश बनला आहे. एक्सपोसॅट ही संशोधनासाठी एक प्रकारची वेधशाळा आहे, जी अवकाशातील कृष्णविवर आणि न्यूट्रॉन ताऱ्यांबद्दल अधिक माहिती गोळा करेल. या उपग्रहामध्ये दोन पेलोड्स आहेत. पहिला – पोलिक्स आणि दुसरा एक्सपेक्ट. पोलिक्स हा या उपग्रहाचा मुख्य पेलोड आहे.

हा उपग्रह अवकाशात होणाऱ्या किरणोत्सर्गाचा अभ्यास करेल. त्यांच्या स्रोतांचे फोटो घेईल. त्यात बसवलेली ‘रमण’ नामक दुर्बीण इस्रोने बनवली आहे. हा उपग्रह विश्वातील 50 तेजस्वी स्रोतांचा अभ्यास करणार आहे. त्यात पल्सर, ब्लॅक होल एक्स-रे बायनरी, ॲक्टिव्ह गॅलेक्टिक न्यूक्ली, नॉन-थर्मल सुपरनोव्हा यांचा समावेश आहे. हा उपग्रह 650 किलोमीटर उंचीवर पाठवण्यात येणार आहे.

कशाचा अभ्यास करणार ?
जेव्हा मोठ्या ताऱ्यांची ऊर्जा संपून जाते, तेव्हा ते गुरुत्वाकर्षणामुळे कोसळतात. ते आपल्यामागे कृष्णविवर, न्यूट्रॉनचे तारे सोडून जातात. एक्स-रे फोटॉन आणि पोलरायजेशनचा वापर करुन एक्सपोसॅट ब्लॅक होल आणि न्यूट्रॉन ताऱ्यांच्या रेडिएशनचा अभ्यास करण्यासाठी मदत करेल. ब्रह्मांडात कृष्णविवराचे गुरुत्वाकर्षण बल सर्वाधिक आहे. न्यूट्रॉन ताऱ्याच घनत्व सर्वाधिक आहे. याबाबत अधिक माहिती मिशनच्या माध्यमातून एकत्रित केली जाईल.