>> नव्या मामलेदारांची नियुक्ती करणार; महसूलमंत्र्यांची माहिती
>> नवनियुक्त मामलेदार केवळ कुळ-मुंडकार खटलेच हाताळणार
कूळ व मुंडकारांचे खटले लवकर व विनाविलंब हातावेगळे करता यावेत, यासाठी नव्या मामलेदारांची नियुक्ती करण्यात येणार असून, या मामलेदारांकडे केवळ कूळ व मुंडकारांच्या खटल्याचे कामच सोपवण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी काल सांगितले. यासंबंधी आपली खात्याचे सचिव, तसेच उत्तर व दक्षिण गोवा जिल्हाधिकार्यांशी चर्चा झाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात मामलेदारांची संख्या कमी असून, जे मामलेदार आहेत, त्यांच्याकडे कायदा व सुव्यवस्था, तसेच अन्य कामांचा ताण आहे. परिणामी कूळ व मुंडकारांच्या खटल्यांचे काम त्यांना हाती घेता येत नसल्याचे दिसून आले आहे. आम्ही उत्तर व दक्षिण गोवा जिल्हाधिकार्यांना कूळ व मुंडकारांच्या खटल्यांचे काम सांभाळण्यासाठी नव्या मामलेदारांची नियुक्ती करण्यास सांगितले आहे, अशी माहिती मोन्सेरात यांनी दिली.
मोन्सेरात यांनी नुकत्याच झालेल्या गोवा विधानसभा अधिवेशनातही कूळ व मुंडकारांचे खटले हातावेगळे करण्यासाठी आपण जिल्हाधिकार्यांना विनाविलंब मामलेदारांची नियुक्ती करण्यास सांगितले असल्याची माहिती दिली होती.
सीसीटीव्ही कॅमेर्यांचा प्रश्न लवकरच सोडवणार
महसूल खात्यात काय चालले आहे, त्यावर महसूल मंत्र्यांना लक्ष ठेवता यावे, यासाठी खात्याच्या सर्व कार्यालयांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव हा आर्थिक अडचणींमुळे शीतपेटीत पडला असून, त्यावर लवकरच तोडगा काढला जाणार असल्याचेही मोन्सेरात यांनी स्पष्ट केले.
ग्रेटर पणजी पीडीए विलिनीकरण योग्यच
ग्रेटर पणजी पीडीए उत्तर गोवा नियोजन व विकास प्राधिकरणात विलीन करण्याचा नगरनियोजन खात्याचा निर्णय हा योग्य असल्याचे मोन्सेरात म्हणाले. त्यावेळी ती पीडीए मला देता यावी, यासाठीच तिची स्थापना करण्यात आली होती, असे मोन्सेरात म्हणाले. यासंबंधी विश्वजीत राणेंनी घेतलेला निर्णय हा योग्यच असून, त्याबाबत कोणताही वाद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.