अनिल होबळे यांची पत्रकार परिषद
कूळ कायद्यातील दुरुस्तीचा गोमंतक भंडारी समाजाबरोबरच अन्य इतर मागासवर्गावर बराच परिणाम झालेला आहे. त्यामुळे विधानसभेत संमत केलेले वादग्रस्त विधेयक मागे घेण्याची मागणी गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष अनिल होबळे यांनी काल पत्रकार परिषदेत केली.कुळाचे नाव जाहीर करण्यासाठी लागू केलेला ३ वर्षांचा निकष रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली. समाजाच्या झालेल्या आमसभेत वरील प्रकरणी अनेक तक्रारी आल्या. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करूनही वरील दुरुस्ती विधेयक मागे घेण्याची मागणी केली होती. या विषयावर कृती कार्यक्रम निश्चित करण्यासाठी ३० रोजी बैठक घेण्याचे ठरविले आहे, असे होबळे यांनी सांगितले. राज्यात भंडारी समाजाची संख्या किमान ५ लाख असल्याचे त्यांनी सांगितले. समाजाचे सर्वेक्षण जवळजवळ पूर्ण झाले असून लवकरच अहवाल जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस उपेंद्र गांवकर उपस्थित होते.