>> आतापर्यंत परदेशातून आणलेल्या 10 चित्त्यांचा मृत्यू
मध्य प्रदेशातील कूनो राष्ट्रीय अभयारण्यात काल आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला. नामिबियातून आणलेल्या ‘शौर्य’ नामक चित्त्याचा दुपारी 3.17 वाजता मृत्यू झाला. तत्पूर्वी, सकाळी 11 वाजता चित्त्यांवर नजर ठेवणाऱ्या पथकाने त्याला पाहिले, तेव्हा तो जंगलात बेशुद्धावस्थेत सापडला होता. पथकाने त्याला सीपीआर (कार्डिओ पल्मोनरी रिसुसिटेशन) दिले. काही वेळाने त्याला शुद्धी आली; पण तो खूप अशक्त झाला होता. परिणामी नंतर त्याचा मृत्यू झाला. या अभयारण्यात मृत्यू झालेल्या चित्त्यांची संख्या आता 10 झाली आहे.
शौर्यच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल. कुनोमधला हा आतापर्यंतचा 10 वा मृत्यू असून, त्यात 7 चित्ते आणि 3 बछड्यांचा समावेश आहे. येथे प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत सप्टेंबर 2022 मध्ये नामिबियातून 8 चित्ते आणण्यात आले, तर फेब्रुवारी 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणखी 12 चित्ते आणण्यात आले.