कूकचे शतक; इंग्लंडचे दमदार पुनरागमन

0
90

>> ऍशेस बॉक्सिंग डे कसोटी

गोलंदाजांच्या सूत्रबद्ध मार्‍यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ३२७ धावांवर रोखल्यानंतर कर्णधार ऍलिस्टर कूकच्या शानदार नाबाद शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने बॉक्सिंग डे कसोटीत दुसर्‍या दिवशी दमदार पुनरागमन करताना २ गडी गमावत १९२ धावा करीत मजबूत स्थिती मिळविली आहे. यंदाच्या या ऍशेस मालिकेत प्रथमच इंग्लंड संघ मजबूत दिसून आला. अजून इंग्लंड १३५ धावांनी पिछाडीवर आहे.

इंग्लंडला ३२७ धावांवर रोखल्यानंतर इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात दुसर्‍या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ५७ षट्‌कांच्या खेळात २ गडी गमावत १९२ धावा बनविल्या आहेत. पहिला दिवस ऑस्ट्रेलियाच्या तर दुसरा दिवस इंग्लंडच्या नावे राहिला. कालच्या दिवसाचे वैशिष्ठ्य ठरले ते कर्णधार ऍलिस्टर कूकचे शानदार नाबाद शतक. बॅडपॅचमधून जाताना एकवेळ कूकला टीकाकारांकडून निवृत्त होण्याचा सल्ला मिळत होता. परंतु कूकने त्यांना तेवढेच दमदार प्रत्युत्तर देताना अजून त्याच्या दम असल्याचे दाखवून देत त्यांची तोंडे बंद केली. वास्तविक इंग्लंडची सुरुवात खराब झाली होती. मार्क स्टोनमेन (१५) आणि जेम्स विंस (१७) हे झटपट तंबूत परतले. स्टोनमेनचा झेल नाथन लियॉनने स्वतःच्याच गोलंदाजीवर टिपला, तर जोस हॅजलवूडने विन्सला पायचितचा शिकार बनविले. परंतु त्यानंतर कर्णधार ऍलिस्टर कूकने जो रुटच्या साथीत तिसर्‍या विकेटसाठी ११२ धावांची शतकी भागीदारी करीत संघाला मजबूत स्थितीत नेले. दुसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कूक १५ चौकारांच्या सहाय्याने १६६ चेंडूत १०४ धावा करून नाबाद खेळत होता. तर त्याला चांगली साथ देताना रुट ६ चौकारांनिशी ४९ धावांवर नाबाद खेळत होता.

तत्पूर्वी पहिल्या दिवसाच्या ३ बाद २४४ अशा मजबूत स्थितीतून काल पुढे खेळताना ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३२७ धावांवर संपुष्टात आला. कर्णधार स्टीव्ह स्मिथ आपल्या धावसंख्येत १६ धावांची भर घालून ८ चौकारांच्या सहाय्याने ७६ धावा करून परतला. मध्यमगती गोलंदा टॉम कुरानने त्याला त्रिफळाचित करीत आपल्या कारकीर्दितील पहिला कसोटी बळी मिळविला. मिशेल मार्श ९ धावा जोडून परतला. लगेच ८ चौकारांच्या सहाय्याने ६१ धावांची अर्धशतकी खेळी केलेला शॉन मार्श स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर पायचित झाला. टीम पायनेने २४ धावा जोडल्या. त्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांना झटपट तंबूत पाठविले. पॅट कमिन्स व जॅकसन बर्डने प्रत्येकी ४ धावा जोडल्या. तर नाथन लियॉनला आपले खातेही खोलता आले नाही. इंग्लंडतर्फे स्टुअर्ट ब्रॉडने ५१ धावांत ४, जेम्स अँडरसनने ६१ धावांत ३ तर ख्रिस वोक्सने २ गडी बाद केले.