>> गोमंतकीय नागरिकांनाही बसणार फटका
कुवेत प्रशासनाने विदेशी कामगारांच्या संख्येवर मर्यादा घालण्याचा निर्णय घेतल्याने तेथे कार्यरत असलेल्या अनेक गोमंतकीय नागरिकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कुवेत नॅशनल ऍसेंब्लीच्या न्याय व विधी समितीने विदेशी कामगारांच्या संख्येवर मर्यादा घालणार्या मसुदा विधेयकाला मान्यता दिली आहे. त्यामुळे कायद्याची अमलबजावणी सुरू झाल्यानंतर कुवेतमध्ये कार्यरत असलेल्या सुमारे ७ लाख भारतीय नागरिकांना परतावे लागणार आहे.
या विधेयकामध्ये देशातील ४.८ दशलक्ष लोकसंख्येपेक्षा भारतीय नागरिकांची संख्या १५ टक्क्यांपेक्षा जास्त असता कामा नये, अशी तरतूद करण्यात आली आहे. सदर विधेयक पुढील कार्यवाहीसाठी दुसर्या समितीकडे पाठविण्यात येणार आहे. कुवेतमध्ये भारतीयांची संख्या १.४ दशलक्ष एवढी आहे. कुवेतमध्ये स्थानिक नागरिक अल्पसंख्याक बनू लागल्याने त्यावर मात करण्यासाठी रणनीती आखली जात आहे. कुवेत प्रशासनाने विदेशी कामगारांवर अवलंबून राहणे कमी करण्याचे धोरण स्वीकारण्याला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.