कुवेतमधील अग्नितांडवात मृत्यूमुखी पावलेल्या भारतीयांचे मृतदेह आणले

0
12

कुवेतमधील मंगाफ येथे एका इमारतीला बुधवारी लागलेल्या भीषण आगीत मृत्यूमुखी पडलेल्या 45 भारतीयांचे मृतदेह घेऊन भारतीय हवाई दलाचे एक विशेष विमान काल भारतात पोहोचले. ते केरळमधील कोची विमानतळावर उतरले, कारण मृतांची सर्वाधिक संख्या (23) केरळमधील होती. त्यानंतर हे विमान दिल्लीला जाणार आहे.
मृत्यूमुखी पडलेल्या इतर 22 जणांमध्ये तामिळनाडूमधील 7, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील प्रत्येकी 3, बिहार, ओडिशा, कर्नाटक, महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा, पंजाब आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

या अपघातानंतर भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह कुवेतला गेले होते. त्यांनी पाच रुग्णालयांना भेट दिली, तिथे जखमी भारतीयांवर उपचार केले जात आहेत. त्यानंतर ज्या विमानाने मृतदेह आणण्यात आले, त्याच विमानाने कीर्तिवर्धन सिंह काल भारतात परतले.

12 जून रोजी कुवेतमधील मंगाफ शहरातील एका इमारतीला लागलेल्या आगीत 49 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 50 हून अधिक लोक जखमी झाले होते. त्यातील 48 मृतदेहांची डीएनए चाचणीद्वारे ओळख पटली असून, त्यापैकी 45 भारतीय, तर 3 फिलिपाइन्सचे असल्याचे निष्पन्न झाले आहे.

विमानतळावर 45 भारतीयांच्या मृतदेहांना श्रद्धांजली अर्पण करून ते त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. मृतदेह ओळखण्यासाठी शवपेटीवर मृत व्यक्तीचा फोटो लावण्यात आला होता. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी कोची विमानतळावर पोहोचत मृतांना श्रद्धांजली वाहिली.