कुळ व मुंडकार कायद्यात गोवा सरकारने दुरूस्ती करून ते खटले मामलेदारांकडून निकालात काढण्यासाठी दिवाणी न्यायालयाकडे सोपवण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्याचे गंभीर व दूरगामी परिणाम शेतकर्यांना भोगावे लागतील. त्यामुळे ही दुरुस्ती रद्द करून हे खटले पूर्ववत मामलेदारांकडे सोपवावेत, अशी मागणी ‘उटा’ चे अध्यक्ष व माजी मंत्री प्रकाश वेळीप यांनी काल पत्रकार परिषदेत केली. यावेळी निमंत्रक गोविंद गावडे व विश्वास गावडे हेही उपस्थित होते.राज्यपाल मृदुला सिन्हा यांना नुकतेच त्याबाबत निवेदन सादर केले आहे. त्याच्या प्रती महसूलमंत्र्यांना व महसूल सचिवांना सादर केल्याचे वेळीप यांनी सांगितले. वर्षभरापूर्वी कायदा आयोगाने सदर कायद्यात बदल करण्याचा प्रस्ताव सादर केला होता, तेव्हा ‘उटा’ ने २४ सप्टेंबर २०१३ रोजी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले होते व कुळ असलेल्या शेतकर्यांना या बदलामुळे त्रास होईल असे नजरेस आणून दिले होते, असे वेळीप यांनी सांगितले.
गोव्यातील चाळीसही आमदारांना यासंदर्भात भेटून निवेदन देणार असल्याचे वेळीप यांनी जाहीर केले.