कुळे येथे कचरा शेडला आग

0
28

>> पंचायतीची यंत्रसामुग्री जळून खाक

कुळे येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या शेडला काल लागलेल्या आगीत शेड जळून खाक होण्याची घटना घडली. शनिवारी मध्यरात्री लागलेली ही आग कुडचडे व फोंडा येथील अग्निशामक दलाने रविवारी पहाटेपर्यंत आटोक्यात आणली.

ह्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या शेडमध्ये असलेली कुळे पंचायतीची मशिनरी ह्या आगीत जळून खाक झाली. ह्या आगीमुळे जवळपासच्या एका व्यायाम शाळेचे नुकसान झाले. ह्या आगीमुळे झालेले नुकसान हे लाखोंच्या घरात असल्याचे अग्निशामक दलाने म्हटले आहे.रात्री 2 च्या सुमारास या कचरा शेडला आग लावली असावी. आगीच्या ज्वाळांनी भिंतींना तडे गेले असून काही ठिकाणी भिंतीवरील सिमेंट पडलेले आहे. तसेच याठिकाणी भरून ठेवलेले ऑईल बॅरेलही जळाले.

कुळे शिगाव पंचायत सरपंच गोविंद शिगांवकर, उपसरपंच नेहा मडकईकर, पंचसदस्य आश्विनी नंदीश नाईक देसाई, बेनी आजावेदो, साईश नाईक, अनिकेत देसाई व सदानंद बांदेकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

दरम्यान, रिवण येथील बाजारपेठेत असलेल्या एका लोखंडी सामान (हार्डवेअर) विक्री दुकानाला शनिवारी रात्री आग लागण्याची घटना घडली. ह्या आगीत सुमारे 15 लाख रु.चे सामान आगीत खाक झाले. ह्या आगीचा फटका ह्या दुकानाच्या बाजूला असलेल्या अन्य दोन दुकानांनाही बसला. आगीचे कारण समजू शकले नाही. अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली.