कुळेत दोघा अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार

0
11

>> तीन परप्रांतीय कामगारांना अटक; सात दिवसांची पोलीस कोठडी

कुळे परिसरात रेल्वे परिसरात दुपदरीकरणाच्या कामासाठी आलेल्या तीन परप्रांतीय कामगारांनी दोघा अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार केला. सोमवारी (दि. 8) रात्री उशिरा ही घटना घडली. कुळे पोलिसांनी या प्रकरणी मंगळवारी रात्री जय सिंग (35), देवलाल आगारिया (22) आणि सना सिंग (24, सर्वजण मूळ रा. छत्तीसगड) यांना अटक केली. संशयितांविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अटक केलेल्या संशयितांना बुधवारी रात्री पोलीस कोठडी मिळवण्यासाठी पणजीतील बाल न्यायालयात दाखल करण्यात आले. त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

कुळे परिसरात सध्या रेल्वेचे दुपदरीकरणाचे काम सुरु आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार दाखल झालेले आहेत. दोन अल्पवयीन मुली 20 दिवसांपूर्वी गोव्यात कामासाठी दाखल झाल्या होत्या. काही दिवसांपासून दोन्ही मुली एका कंत्राटदारामार्फत कुळे परिसरात रेल्वेच्या कामासाठी दाखल झाल्या होत्या. दि. 8 जानेवारीच्या रात्री 10 वाजण्याच्या सुमारास दोन्ही अल्पवयीन मुली आपल्या मूळ गावी रेल्वेने जाण्यासाठी कुळे येथे दाखल झाल्या. भूक लागल्याने खाण्याचा शोध घेत असताना त्या दोघांना हे तिन्ही संशयित भेटले. काही दिवसांपूर्वी काम करीत असताना त्यांची ओळख झाली होती. या संशयितांनी त्या मुलींना ते ज्या परिसरात राहत होते, तेथील झोपडीत नेऊन जेवण दिले. त्यानंतर रात्र बरीच झालेली असल्याने त्या मुलींना तिथेच राहण्याची विनंती केली. यानंतर रात्री उशिरा तिन्ही संशयितांनी दोन्ही अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार केला.

ही घटना घडल्यानंतर मंगळवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलींनी रेल्वे स्थानकाजवळ येत एका दुकानदाराला याविषयी माहिती दिली. दुकानदाराने सदर माहिती रेल्वे पोलिसांना दिल्यानंतर वास्को रेल्वे पोलिसांनी धाव घेऊन चौकशी केली. त्यानंतर सदर प्रकरण कुळे पोलीस स्थानकावर नेण्यात आले. दोन्ही अल्पवयीन मुलींनी तक्रार दाखल केल्यानंतर कुळे पोलिसांनी तपास करून मंगळवारी रात्री उशिरा संशयितांना अटक केली.