कुलगाममध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा

0
5

चकमकीत आतापर्यंत चार दहशतवादी ठार

सुरक्षा दलाची शुक्रवारपासून शोधमोहीम सुरू

अजूनही दहशतवादी लपल्याचा संशय

जम्मू-काश्मीरमधील कुलगामच्या अखल जंगलात दहशतवाद्यांविरुद्ध केलेल्या कारवाईत दोन दहशतवाद्यांना यमसदनी पाठवण्यात आले. येथे शुक्रवारपासून सुरक्षा दलातर्फे शोधमोहीम सुरू असून या शोधमोहिमेचा रविवारी तिसरा दिवस होता. येथे अजूनही दोन दहशतवादी लपल्याचा संशय असून एक दहशतवादी जखमी झाला आहे. या शोधमोहिमेत आतापर्यंत चार दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाकडून खात्मा करण्यात आला आहे.

काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात भारतीय संरक्षण दलाने राबवलेल्या ऑपरेशन अखलमध्ये 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे, तर चकमकीत एकजण जखमी झाला आहे. घनदाट अखल जंगलात सुरु असलेले ऑपरेशन अखलच्या तिसऱ्या दिवशी दहशतवाद्यांना घेरण्यासाठी भीषण गोळीबार सुरू ठेवण्यात आला. या चकमकीत तीनजणांना घेरण्यात आले. ज्यामध्ये दोनजण ठार झाले आहेत. तर एकजण जखमी झाली आहे.
परिसरात दहशतवादी कारवायांची गुप्त माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी शोध मोहीम सुरू करण्यात आली. यादरम्यान, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला, त्यानंतर चकमक सुरू झाली. जंगलात लपलेल्या एकूण दहशतवाद्यांची संख्या अद्याप समजू शकलेली नाही. कारवाई करण्यासाठी अधिक सुरक्षा दलांना त्या भागात पाठवण्यात आले आहे. शनिवारी दि. 1 ऑगस्टच्या रात्री सुरू झालेल्या शोधमोहिमेनंतर सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले. पुलवामा येथील हरिस नझीर डार म्हणून एका दहशतवाद्याची ओळख पटली. पहलगाम हल्ल्यानंतर गुप्तचर संस्थांनी 26 एप्रिल रोजी ज्या 14 स्थानिक दहशतवाद्यांची नावे जाहीर केली होती, त्यांच्या यादीत सी-श्रेणीतील दहशतवादी हरिसचा समावेश होता. त्याच्याकडून एके-47 रायफल, मॅगझिन-ग्रेनेड आणि दारूगोळा जप्त करण्यात आला.

जवान जखमी

या चकमकीत एक लष्करी जवानही जखमी झाला, ज्यावर श्रीनगरमधील 92 बेस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. स्पेशल ऑपरेशन ग्रुप, जम्मू आणि काश्मीर पोलिस, लष्कर आणि सीआरपीएफ ‘ऑपरेशन अखल’ राबवत आहेत. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी हाय-टेक पाळत ठेवणारी यंत्रणा वापरली जात आहे.
शनिवारी सकाळी भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने एका दहशतवाद्याला ठार मारल्याची माहिती दिली होती. कुलगाममध्ये शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केला. 31 जुलै रोजी पूंछमधील नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीच्या प्रयत्नात आणखी दोन दहशतवादी मारले गेले. कुलगाममधील चकमकीदरम्यान मोठ्या संख्येने सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.
28 जुलै रोजी पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाइंडसह 3 दहशतवादी मारले गेले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ऑपरेशन महादेवच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 29 जुलै रोजी पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना ठार मारल्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की 28 जुलै रोजी तीन दहशतवादी मारले गेले. त्यांची नावे सुलेमान, अफगाण आणि जिब्रान आहेत. हे तिन्ही दहशतवादी पहलगाम हल्ल्यात सहभागी होते.
पाकिस्तानी मतदार ओळखपत्र-चॉकलेटद्वारे पहलगाममधील दहशतवाद्यांना ओळखले. त्या दिवशी हल्ल्याची योजना आखली, 3 महिने त्यांचा माग काढला आणि नंतर त्यांना घेरून ठार मारले. आमच्याकडे याचे पुरावे असल्याचेही गृहमंत्री शहा यांनी सांगितले.

दहशतवाद्यांचा गोळीबार

दुसरीकडे भारतीय सेनेच्या चिनार कॉर्प्सने रात्रभर राबवलेल्या ऑपरेशनमध्ये तीव्र स्वरुपाचा गोळीबार करण्यात आल्याचे वृत्त आहे. चिनार कॉर्प्सने म्हटले, अलर्ट मिळताच जवानांनी कॅलिब्रेटेड गोळीबाराने दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले आणि संपर्क राखत फास आवळला.’ रात्री झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांना आणखी एका दहशतवाद्याला ठार करण्यात यश आले आहे, ज्यामुळे ठार केलेल्या दहशतवाद्यांची संख्या 4 वर पोहोचली आहे.

7 दहशतवादी ठार, सातांचा शोध सुरू

सुरक्षा दलांनी ज्या 14 दहशतवाद्यांची नावे जाहीर केली होती, त्यापैकी 7 जणांना आतापर्यंत ठार करण्यात आले आहे. हरिस नझीर वगळता उर्वरित 6 दहशतवादी मे महिन्यात शोपियान आणि पुलवामा येथे झालेल्या चकमकीत मारले गेले.

आठवड्यातील तिसरी चकमक

जम्मू आणि काश्मीरमध्ये या आठवड्यात झालेली ही तिसरी चकमक आहे. यापूर्वी, 28 जुलै रोजी, ऑपरेशन महादेव अंतर्गत, सुरक्षा दलांनी लिडवासच्या जंगलात पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या 3 दहशतवाद्यांना ठार मारले होते.