‘कुपोषण’ ः गंभीर समस्या भाग – १

0
339
  • डॉ. सुरज सदाशिव पाटलेकर
    (अध्यापक, गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय)

‘कुपोषण’ ही व्याधी नव्हे तर अवस्था आहे ज्यामुळे व्याधी उत्पन्न होऊ शकतात आणि ही फक्त लहान बाळांमध्येच होते असे नाही तर प्रत्येक वयाच्या मनुष्यामध्ये होऊ शकते. यालाच ‘मालन्यूट्रीशन’ म्हटले जाते.

आपण इतर कित्येक आजारांबद्दल व त्यामुळे आलेल्या मृत्यूंबद्दल बोलत असतो पण कुपोषणाने त्रस्त असलेल्या, मृत्यू झालेल्या लोकांचा आकडाच आपण लक्षात घेत नाही. दर दिवसाला जवळपास २०-२५ हजार लोक हे उपासमार, कुपोषणाने आणि त्यामुळे आलेल्या व्याधीने मृत्यू पावतात. एका वर्षात जगातील एकूण १०.४ दशलक्ष मृत्यूंपैकी, ५.६ दशलक्ष मृत्यू हे कुपोषणाने होतात. मृत्यू झालेल्यांमध्ये ४०-५० टक्के हे पाच वर्षाखालील वयोगटातील आहेत आणि विश्वाच्या एकूण लोकसंख्येच्या एक तृतीयांश कुपोषित मुलं ही आपल्या देशात, भारतात आहेत. खूप दूरपर्यंत आणि व्यापक अशी ही समस्या आहे, विशेषत: विकसनशील देशामध्ये. यातूनच आपण या परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊ शकतो.

‘कुपोषण’ ही व्याधी नव्हे तर अवस्था आहे ज्यामुळे व्याधी उत्पन्न होऊ शकतात आणि ही फक्त लहान बाळांमध्येच होते असे नाही तर प्रत्येक वयाच्या मनुष्यामध्ये होऊ शकते. यालाच ‘मालन्यूट्रीशन’ म्हटले जाते. शरीराची वाढ, विकास व चयापचयासाठी आवश्यक असलेले घटक किंवा पोषकांश उचित प्रमाणात न मिळणे (कमी वा जास्त झाल्यास) म्हणजेच कुपोषण. आता यातही ‘अंडर-न्यूट्रीशन’ (कमी प्रमाणात पोषण होणे) आणि ‘ओवर-न्यूट्रीशन’ (पोषण जास्त प्रमाणात होणे ज्यामुळे स्थौल्यासारखे व्याधी होतात) असे २ प्रकार आहेत. पण या लेखात आपण अंडरन्यूट्रीशन हाच अर्थ विचारात घेऊया. आधुनिक शास्त्रानुसार.. ए/सी/बी-३/डी ही जीवनसत्त्वे, उष्मांक, क्षार म्हणजेच लोह, इ., झिंक, आयोडीन, प्रथिने, कर्बोदके यांसारख्या गोष्टींचा शरीराला अभाव होणे म्हणजेच अंडर-न्यूट्रीशन. विटामिन-सीच्या कमतरतेमुळे स्कर्वी नावाचा व्याधीसुद्धा होतो ज्यात हिरड्यांमधून रक्त येऊ लागते.

याचे स्वास्थ्यावर भयानक परिणाम होतात व ते शारीरिक तसेच मानसिक(आई व बाळ दोघांचे) दोन प्रकारचे असतात. ह्यामागचे सर्वांत मोठे कारण आहे योग्य आहाराविषयी ज्ञानाचा अभाव, गरिबी ज्यामुळे योग्य अन्न/आहार मिळविण्यास आलेली अडचण (खासकरून दुष्काळ, पूरग्रस्त स्थितीमध्ये), निरक्षरता, स्वास्थ्याकडे दुर्लक्ष, स्तन्यपान (बाळाला दिले गेलेले आईचे दूध) गरजेपेक्षा लवकर थांबवणे/बंद करणे, कामामुळे (शक्यतो घरापासून दूर) व्यस्त महिला व त्यामुळे झालेले बाळाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष (सोबत वडिलांचे व घरातील इतर व्यक्तींचेही दुर्लक्ष तेवढेच कारणीभुत ठरू शकते), स्तन्यपानाबद्दल गैरसमज, स्तनास दूध न येणे, गरज नसताना अनुचित वेळी दुधाला पर्याय देणे, जन्माच्या वेळेस कमी वजनाच्या बाळाचा जन्म (५.५ पाउंड/२५०० ग्राम पेक्षा कमी वजनाचे), आईचे कुपोषण, बाळाला चुकीच्या पद्धतीने दूध पाजणे, कुटुंबनियोजन करतेवेळी दोन मुलांच्या जन्मामध्ये योग्य अंतर न ठेवणे, बायकांना प्रसूतीच्यावेळेस असलेला धोका, अयोग्य वैद्यकीय सुविधा किंवा अगदीच नसणे, असेही आजार (क्षय/टी.बी, इन्फेक्शन इत्यादी) ज्यांचे निदान पटकन होत नसते, आईला तिच्या गरोदरपणात झालेले आजार (हृद्रोग, आतड्यांना आलेली सूज, मलेरिया, न्यूमोनिया, पांडु/ऍनीमिया, मेनिंजायटीस/डोक्याचा आतील सूज).

आधुनिक वैद्यकीय शास्त्रामध्ये हे ‘प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रीशन’ म्हणून ओळखले जाते. त्याचेच उपप्रकार आहेत ‘क्वशिओरकर’ व ‘मरासमस’ आणि ह्या दोन्हींचा समूह मरासमिक क्वशिओरकर.
‘क्वशिओरकर’- मध्ये प्रथिनांची कमतरता प्रामुख्याने असते पण ऊर्जेचा स्रोत चालू असतो. अंगाचे दूध सोडल्यापासून म्हणजे साधारणतः १८ महिने ते ४ वर्षापर्यंत हा होऊ शकतो. पण वयाच्या ६ महिन्यानंतरसुद्धा होताना दिसून आले आहे. त्वचा काळपट पडणे (रंग बदलणे, कधी कधी सफेद रंगाचीसुद्धा होते जसे की पांडुमध्ये), त्वचेवर पुरळ येणे, केस विरळ होणे, नखांची छटा बदलणे, भूक-तहान न लागणे व त्यामुळे घटलेले वजन, उंची न वाढणे (मुख्य लक्षण), शरीरामध्ये पाणी जास्त प्रमाणात राहिल्याने हातापाय, तोंड (चेहरा गोल, मून फेस-चंद्राकार) आणि बेंबी/नाभीला सूज येणे (हे सोडून बाकीचे अंग किडकिडीत व बारीक असते, शोष झालेला असतो), यकृताला सूज येणे, औदासीन्यता, सतत अनुत्साही असणे, थकवा-सुस्ती-आळस येणे, नेहमी डोळ्यांतून अश्रूंचा स्राव होत राहणे, बुद्धी व शारीरिक हालचाल/क्रिया यामध्ये योग्य समन्वय नसणे, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे, सतत चिड़चिड़ होणे, इन्फेक्शन (कानाचे इ.), जुलाब/अतिसार होणे, पोट फुगणे यांसारखी लक्षणे असतात. चिकित्सेने फरकही पडतो पण जर योग्यवेळी चिकित्सा दिली गेली नाही तर रुग्णास शारीरिक व मानसिक अपंगत्व/दुबळेपणा येतो, कोमा (बेशुद्ध), शॉकमध्ये जाऊन, अवयव निकामी होऊन मृत्यूसुद्धा येऊ शकतो.

‘मरासमस’मध्ये प्रथिनांसहित ऊर्जा आणि इतर पोषकांशांचीही कमतरता असते. वयाच्या १ वर्षापर्यंत हा होण्याचा धोका जास्त असतो. यात त्वचेखालील चरबी व मांसधातु-स्नायू कमी होतात, र्‍हास होतो (नितंब व दोन्ही हातांचे जास्त प्रमाणात) व हेच मुख्य लक्षण आहे ह्या व्याधीचे. शरीराच्या एकूण अपेक्षित वजनापेक्षा ६२% वजन कमी होते. सूज मात्र नसते. शरीराचे तापमान कमी-जास्त होणे, पांडु (मया), डीहायड्रेशनमुळे तहान खूप लागणे व डोळे आत गेल्यासारखे वाटणे, नाडीगती मंद होणे, हातपाय थंडगार पडणे, देहभान/शुद्धी नसणे, हृदयाची क्रिया मंदावणे किंवा बंद पडणे, न्यूमोनिया होणे, पोट फुगणे, पोटातून आवाज येणे, यकृताला सूज येणे, संडासाच्यावाटे रक्त किंवा फेस पडणे, विटामिन-ए ची कमतरता असल्याने डोळ्यांना मार बसणे-दृष्टी कमी होणे, केस गळणे, त्वचा रूक्ष होणे, बरगड्या दिसणे, नाक-कान-घसा यामध्ये इन्फेक्शन होणे, चिडचिडा व चटकन राग येणारा स्वभाव (शॉर्ट-टॅम्पर्ड) यासारखी लक्षणे असतात.
(क्रमश:)