शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून हॉटेलमध्ये तोडफोड
कॉमेडियन कुणाल कामरा याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तयार केलेल्या विडंबनात्मक गाण्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. कुणाल कामराने आपल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणारे गाणे म्हटले होते. संबंधित गाण्याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ खासदार संजय राऊत यांनी ट्विट केला. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आक्रमक झाली. शिवसेनेच्या नेत्यांनी पोलीस ठाण्यात जात कुणालच्या विरोधात तक्रार दिली. याप्रकरणी कुणालच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याशिवाय शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कुणालचा कार्यक्रम ज्या हॉटेलमध्ये झाला, त्या हॉटेलमध्ये जात तिथल्या सभागृहाची तोडफोड केली.
कुणाल कामराने त्याच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ युट्यूबवर शेअर केल्यानंतर तो व्हायरल झाला. त्यामधील एकनाथ शिंदेंवरील कविता ऐकून शिवसैनिक (शिंदे) संतापले आणि त्यांनी रविवारी रात्री खार येथील द युनिकॉन्टिनेंटल मुंबई या हॉटेलवर हल्ला केला. हॉटेलमधील स्टुडिओची तोडफोड केली. कुणाल कामराने युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबमध्ये कार्यक्रम घेतला होता. या क्लबमध्ये जाऊन एकनाथ शिंदेंच्या समर्थकांनी धुडगूस घातला. या क्लबमधील खुर्च्यांची आणि संपूर्ण सेटची तोडफोड केली.
या तोडफोडप्रकरणी खार पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाच्या युवासेनेचे सरचिटणीस राहुल कनाल आणि वांद्रे विभागप्रमुख कुणाल सरमळकर यांना काल पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतले होते. त्या पाठोपाठ आणखी 18 जणांना जणांना ताब्यात घेतले होते. या तोडफोड प्रकरणात 12 जणांना अटक करण्यात आली असून, राहुल कनाल यांच्यासह इतर 11 जणांना काही वेळापूर्वी वांद्रे न्यायालयासमोर हजर केले. सुरुवातीला त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यानंतर त्या सर्वांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.