काल दुपारी कुंडई येथील प्रॉक्टर अँड गॅम्बल कंपनीच्या कामगारांना घेऊन जाणारी इन्होवा गाडी क्रमांक जीए ०५-टी-४००० कुडणे-न्हावेली या गावांना जोडणार्या पावलार या ठिकाणी असलेल्या पुलावरून नदीत कोसळून डिचोली तालुक्यातील फणसवाडी-खरपाल येथील शैलेश दशरथ गावस हा कंपनीचा कर्मचारी ठार झाला तर सोबत असलेला अन्य एक कामगार आप्ताफ आलम शेख व कारचालक नियम पात्रा (ओरिसा) हे दोघे गंभीर जखमी झाले.
याविषयीची सविस्तर माहिती अशी की, काल दि. ११ रोजी दुपारी १२ वाजता कुंडई येथील प्रॉक्टर अँड गॅम्बल कंपनीचे नियमित कर्मचारी आप्ताफ आलम शेख व प्रशिक्षणार्थी (ट्रेनी) कर्मचारी शैलेश दशरथ गावस यांना घरी पोचवण्यासाठी दुपारी १२ वाजता इन्होवा कार कुंडई येथून सुटली. न्हावेली येथील पावलार या ठिकाणी असलेल्या उतारावर कार पोचली असता चालकाचा ताबा सुटल्याने कारची जोराची धडक पुलाच्या कठड्यावर बसून ती सरळ नदीत कोसळली. दुपारी १ च्या दरम्यान घडलेल्या अपघातात शैलेश गावस हा कर्मचारी जागीच ठार झाला. तर अन्य कर्मचारी आप्ताफ शेख व कारचाल नियम पात्रा हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर जखमींना त्वरित साखळी येथील हॉस्पिटलमध्ये नेल्यावर शैलेश गावस याला मृत घोषित करण्यात आले. जखमींवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बांबोळी येथील गोमेकॉत पाठविण्यात आले. घटनेचा पंचनामा साखळी पोलिसांनी केला.