कुडचिरे बाराजण येथील नियोजित कचरा प्रक्रिया प्रकल्प रद्द होणार

0
5

>> आमदार प्रेमेंद्र शेट यांची पत्रकार परिषदेत माहिती

कुडचिरे बाराजण येथील नियोजित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प रद्द करण्यात येणार असून लोकभावना व ग्रामस्थांनी केलेला विरोध तसेच गावातील सलोखा अबाधित रहावा यासाठी ही भूमिका घेतल्याचे काल मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर या संदर्भातील निर्णय घेण्यात आल्याची माहिती आमदारांनी यावेळी दिली.

दोन महिन्यांपूर्वी सदर प्रकल्पाबाबत सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्यांना गावकऱ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला. त्यानंतर विरोधकांनी राजकारण करण्याचा प्रयत्न करताना अनेक आरोप केले. मात्र आम्ही गावातील लोकांबरोबर असून लोकांची एकूण भावना लक्षात घेत व सविस्तर विचार मंथन करून या प्रकल्पाबाबत सरकारने योग्य भूमिका घेत हा प्रकल्प येथून रद्द करण्यात यावा अशी भूमिका घेतलेली आहे. त्या संदर्भात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना लोकांच्या भावना कळवल्या असल्याचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी स्पष्ट केले. या संदर्भात मुख्यमंत्री योग्य भूमिका घेतील अशी माहिती दिली.

विरोधकांनी या प्रकरणी राजकारण करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्ही आमची भूमिका लोकांची भावना लक्षात घेत निश्चित करताना हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असून लोकांची मागणी निश्चित मान्य होणार असल्याचे आमदार शेट यांनी स्पष्ट केले.

यावेळी सरपंच गावकर यांनी, पंचायत मंडळाने या प्रकल्पाला विरोध केला असून त्याला आमदार तसेच मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सहकार्य करून सकारात्मकता दाखवली त्याचे स्वागत असल्याचे सांगितले. यावेळी मावळिंगे, कुडचिरे पंचायत सदस्य, तसेच जिल्हा अध्यक्ष शंकर चोडणकर, भाजप मंडळ अध्यक्ष दया कारबोटकर उपस्थित होते.