कुडचिरेत बांधकाम कचरा प्रकल्पाला विरोध

0
10

मये मतदारसंघातील कुडचिरे येथे बांधकाम कचरा आणि विल्हेवाट (सी अँड डी) प्रकल्पाच्या प्राथमिक सर्वेसाठी आलेल्या पथकास कुडचिरे ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला. यानंतर पोलीस बंदोबस्तात ही सर्वे प्रक्रिया सुरू करण्यात आली, त्यावेळी ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

उपलब्ध माहितीनुसार, 2019 पूर्वी कुडचिरे येथे सुमारे 40 हजार चौरस मीटर जागा आरक्षित केली असून, त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन अँड डिमॉलिशन (सी अँड डी) प्रकल्प उभारण्यात येणार आहे. वेस्ट मॅनेजमेंट नोडल एजन्सी अंतर्गत हा प्रकल्प इथे उभारण्यात येणार असून, या ठिकाणी जुन्या इमारतींच्या अवशेषांवर प्रक्रिया करण्यासाठी विशेष प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

काल या ठिकाणी मामलेदार प्रवीण गावस यांच्या उपस्थितीत व पोलिसांच्या बंदोबस्तात वेस्ट मॅनेजमेंटचे पथक सर्वे करण्यासाठी आले असता, त्या ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला. मयेचे आमदार प्रेमेद्र शेट हे त्या ठिकाणी दाखल झाले व त्यांनी लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांची ग्रामस्थांशी काही वेळ झटापटही झाली. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात वाढ करून सर्वे प्रक्रिया करण्यात आली. पोलिसांनी काही लोकांना तेथून हटवले, तर काहींना पोलीस स्थानकात आणून नंतर त्यांना सोडण्यात आले. मात्र या संदर्भात कोणावरही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

मुख्यमंत्र्यांसोबत झाली बैठक
दरम्यान, काल सकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमवेत आमदार प्रेमेंद्र शेट, तसेच मावळींगे-कुडचिरे पंचायतीच्या सरपंच व पंचायत मंडळाची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सदर प्रकल्पाबाबत पंचायत मंडळास पूर्ण माहिती दिली. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा ओला किंवा सुका कचरा येणार नाही, तर पूर्णपणे पाडलेली बांधकामे व त्याचे अवशेष याच्यावरच प्रक्रिया होणार असल्याची हमी मुख्यमंत्र्यांनी यावेळी पंचायत मंडळास
दिली.