कुडचड्यात २५ डिसेंबरपासून चंदेरी महोत्सव

0
89
कुडचडे येथे चंदेरी महोत्सवाच्या माहिती देणारी आवाहन पत्रिकेचे अनावरण करताना वीजमंत्री नीलेश काब्राल. सोबत मान्यवर.

सांगे (न. प्र.)
कुडचडे येथे होणार्‍या तिसर्‍या चंदेरी महोत्सवाच्या पूर्व तयारीचा शुभारंभ कार्यक्रम विजयादशमीच्या शुभमुहुर्तावर श्री सातेरी देवी मंदिरात महोत्सवाचे आश्रयदाते वीजमंत्री नीलेश काब्राल व दयानंद कला केंद्राच्या ज्येष्ठ सदस्यांनी देवीकडे प्रार्थना करून केला. मंदिर पुरोहित आनंद मराठे यांनी ज्येष्ठ सदस्य लक्ष्मण मडगावकर, अध्यक्ष मोर्तू नाईक, उपाध्यक्ष अशोक नाईक, नवीन खांडेकर, कुतिन्हो व नीता वस्त, सदानंद खांडेकर, गुरू नाईक, सुभाष नाईक, राया देसाई यांच्या उपस्थिती गार्‍हाणे घालून हा उत्सव सुरळीतपणे होण्यासाठी गार्‍हाणे घालण्यात आले. तसेच यावेळी आवाहन पत्रिकेचे अनावरणही झाले.
याप्रसंगी बोलताना मंत्री काब्राल यांनी, चंदेरी महोत्सवाला राष्ट्रीय महोत्सवाचा दर्जा प्राप्त व्हायला हवा. त्यासाठी आपण सर्वानी आयोजनात समरस होणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. अध्यक्ष मोर्तू नाईक यांनी यंदा महोत्सवाच्या जागेत बदल केल्याचे निदर्शनास आणून दिले व हा महोत्सव डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दि. २५ ते ३१ डिसेंबरपर्यंत कुडचड्यातील येथील नव्या कदंबा बसस्थानकाच्या जागेत घ्यायचे ठरविल्याचे सांगितले. यावेळी उपाध्यक्ष नवीन खांडेकर यांनी, ग्रामदेवांना पालखीतून मिरवणुकीने चंदेरी स्थळी आणून त्याच्या समारे उद्घाटन करावे असे सूचवले. खजिनदार शिवाजी वस्त म्हणाले की, यंदाच्या महोत्सवाला विशेष महत्त्व आहे. गेली कित्येक वर्षे कुडचड्याला मंत्रिमंडळात स्थान नव्हते. यंदा आमचे प्रमुख पुरस्कर्ते नीलेश काब्राल यांना ते मिळाल्यामुळे संस्थेला आनंद झाला आहे. त्यामुळे सभासदांचाही उत्साह वाढला. त्यासाठी आम्ही हा सात दिवसाचा महोत्सव मोठ्या प्रमाणावर करणार असून त्याद्वारे गोव्याचे लक्ष वेधून घेणार असल्याचे सांगितले. याचवेळी कला केंद्राने आपल्या संकेत स्थळ निर्मितीची घोषणा केली. कुडचडे मतदारसंघाल अनेक युवकांनी कला केंद्र सदस्य होण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यानुसार यावेळी युवा कलाकार निखिल नाईक (शेल्डे), साहिल सावंत देसाई (बाणसाय), योगेश भोसले (बागवाडा-कुडचडे), यश नाईक (बाणसाय), गौतम फडते (होडर) यांना सदस्य करून घेण्यात आले. गौतम फडते यांनी नवोदित कलाकारांचे यावेळी स्वागत केले. त्यानंतर त्यांनीच आभार मानले.