कुडचड्यात ख्रिस्ती स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात नासधूस

0
110

>> पोलिसांची चाहुल लागताच संशयित पळाला

गोव्याच्या विविध भागांमध्ये धार्मिक स्थळांच्या नासधुशीच्या घटना ताज्या असतानाच कुडचडे येथील गार्डीयन एंजल चर्चच्या स्मशानभूमीतील क्रॉस आणि थडग्यांची मोडतोड करण्यात आल्याचे आढळून आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे साडे तीनच्या सुमारास गस्तीवरील पोलिसांना सदर स्मशानभूमीतून आवाज ऐकू आल्याने त्यांनी तेथे धाव घेतली असता एक किरकोळ शरीरयष्टीची व्यक्ती आत तोडफोड करीत असल्याचे पोलिसांना आढळले. मात्र, पोलिसांना पाहताच सदर व्यक्तीने जवळच्या जंगलात पलायन केले. दाट झाडीमुळे या इसमाला पळून जाता आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
स्मशानभूमीत तोडफोड झाल्याचे स्पष्ट होताच कुडचडे पोलीस स्थानकाचे निरीक्षक फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असता, आतील थडगी तसेच मुख्य क्रॉसची मोडतोड झाल्याचे दिसून आले.
पोलीस प्रमुख मुकेशचंद्र आणि दक्षिण गोव्याचे अधीक्षक अरविंद गावस यांनी काल घटनास्थळी जाऊन पाहणी केली व संबंधितांना कोणत्याही परिस्थितीत आरोपीला पकडण्याचे आदेश दिले. संशयिताला पकडण्यासाठी जाळे लावण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक वायंगणकर यांनी सांगितले. विशेष म्हणजे स्मशानभूमीची नासधूस करण्यापूर्वी येथील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचीही मोडतोड करण्यात आल्याचे आढळून आले आहे.
कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांचा काल वाढदिवस होता. गेल्या वर्षीही त्यांच्या वाढदिवसाची संधी साधून अशाच प्रकारे कृत्य करण्यात आले होते. त्यामुळे हे जे चालले आहे ते आपल्यासाठी चालले आहे की काय याची कल्पना नाही, परंतु जे चालले आहे ते समाजाच्या हिताचे नसल्याचे काब्राल यांनी सांगितले.
नासधुशीची माहिती मिळताच केपे, काणकोण व सांगेच्या पोलीस निरीक्षकांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांनी धार्मिक तेढ निर्माण करणे, सार्वजनिक वस्तूंची नासधूस करणे आदीसाठी अज्ञाताविरुद्ध फौजदारी दंडसंहितेचे कलम ४९/१७ व भादंसं कलम २९५, २९७, २२७ खाली गुन्हा नोंदवला आहे.
गेल्या काही दिवसांत दक्षिण गोव्यात धार्मिक स्थळांच्या नासधुशीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. शेळवण परिसरातील एक घुमटी, कुडचडे बाजार परिसरातील एका क्रॉसची यापूर्वी मोडतोड करण्यात आलेली आहे. त्यामुळे परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. मात्र पोलिसांचा डोळा चुकवून पहाटे अडीच ते तीन दरम्यान सदर ख्रिस्ती स्मशानभूमीत ही नासधूस करण्यात आली.
या स्मशानभूमीच्या विरुद्ध बाजूस टेकडीवर एक कब्रस्थान आहे. तेथे पोलीस गस्तीवर होते. मात्र, खालील ख्रिस्ती समाजाच्या स्मशानभूमीत घुसून थडग्यांची नासधूस करण्यात आली. पोलिसांना आत एक व्यक्ती आढळली, परंतु मुख्य गेटला कुलूप असल्याने व स्मशानभूमीच्या तिन्ही बाजूंना दाट झाडी असल्याने सदर व्यक्ती पळून जाण्यात यशस्वी ठरल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. स्मशानभूमीची देखरेख ठेवणारे समितीचे खजिनदार आगोस्तिन पिरीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंधरा थडगी, पंचवीस नामफलक व आठ क्रॉसची मोडतोड करण्यात आल्याचे आढळून आले आहे.
२०१२ सालीही येथे असाच प्रकार झाला होता. त्यावेळीही क्रॉसची मोडतोड करण्यात आली होती. मात्र, कालच्या घटनेचे पोलीसच साक्षीदार ठरल्याने तपासाची चक्रे वेग घेऊ लागली आहेत. श्वानपथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. मात्र, घटनास्थळापासून पाचशे मीटरपर्यंत हे श्वान माग काढून घुटमळले असे पोलिसांनी सांगितले. पावसामुळे पुढील माग काढण्यात त्याला अपयश आले असावे असा कयास आहे.