>> उद्या होणाऱ्या निवडणुकीसाठी सरकारी यंत्रणा सज्ज
लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण गोव्यात कुठ्ठाळी व वास्को मतदार संघातील काही मतदान केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. कुठ्ठाळी मतदारसंघात पाच तर वास्को मतदारसंघातील एक मतदान केंद्र संवेदनशील घोषीत करण्यात आले आहे. तसेच कुठ्ठाळी मतदारसंघात सर्वाधिक 8 मतदान केंद्रे चिंताजनक म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
या मतदारसंघात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत रोख रक्कम, इलेक्ट्रॉनिक व इतर वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात परप्रांतिय मतदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील काही केंद्रे चिंताजनक तसेच संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. लोकसभेसाठी उद्या मंगळवार 7 मे रोजी मतदान होणार असून मतदान यंत्रे व मतदानासाठी लागणारे आवश्यक साहित्य मामलेदार कार्यालयाने सज्ज ठेवले आहे. मतदानासाठी उद्या वापरण्यात येणारी मतदान यंत्रे स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आली आहेत. हे साहित्य आज सोमवारी निवडणूक कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.
दरम्यान, काल रविवारी संध्या. 5 वा. लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीर प्रचार बंद झाला आहे. घरोघरी गाठीभेटी घेण्याबरोबर सोशल मीडियावरील प्रचार सुरूच राहणार आहे. दरम्यान, 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग मतदारांसाठी मतदान प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण झाली आहे. निवडणूक आयोगाने मुरगाव तालुक्यात 147 मतदान केंद्रांची उभारणी केली असून सुमारे 880 कर्मचारी तैनात केले आहेत. याव्यतिरिक्त 165 कार्यालयीन कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत. मतदानासाठी लागणारी मतदान यंत्रे व इतर साहित्यांचे वाटप संबंधित मामलेदार कार्यालयातून आज करण्यात येईल.
दरम्यान मतदान केंद्रांवर मतदानासाठी येणाऱ्या मतदारांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करण्याची तयारी जोरात सुरू आहे. मतदान केंद्रांवर लहान मंडप उभारण्याचे काम सुरू आहे. मतदारांना उन्हाचा त्रास होऊ नये, याची खबरदारी राज्यातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने घेतली आहे. त्याचबरोबर अधिकाधिक मतदार मतदान करतील, यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर किती मतदार आहेत, याचा अभ्यास करून त्यानुसार सरकारी कर्मचारी व अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. सुरक्षेच्यादृष्टीने पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात येणार आहे. मतदान केंद्रे सज्ज होण्यासाठी गतिमान पावले उचलण्यात आली आहेत.
तयारी अंतिम टप्प्यात
मतदान केंद्राच्या परिसरातील 200 ते 250 मीटर या अंतरावर पांढरे पट्टे मारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या ठिकाणी जमाव होऊ नये किंवा जमावाने कुणी येऊ नये, यासाठी निवडणूक अधिकारी कार्यालयाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. मतदान केंद्रावर मंडप उभारण्याबरोबरच मतदारांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येत आहे.