कुठे मिळेल सुखी माणसाचा सदरा?

0
787

– सौ. संगीता प्र. वझे, बोरी – फोंडा
‘सुखी माणसाचा सदरा’ या नावाची बोधकथा लहानपणी आपण सर्वांनीच वाचलेली वा ऐकलेली आहे. पण आजूबाजूला पाहताना विचार येतो की, कोठे असतील अशी सुखी माणसे आणि त्यांचा तो सदरा कोठे असेल? आपल्याला कधी मिळणार? संतांनी तर आपल्या ग्रंथात लिहूनच ठेवलेय, ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूचि शोधुनि पाहे.’ या जगात बहुतांश लोक या ना त्या कारणाने ग्रस्त असताना कोठून आणावेत एवढे सुखी माणसांचे सदरे?
वरील विधानाचा अर्थ लक्षात घेतला तर जगात पूर्ण सुखी एकही व्यक्ती नाही असा होतो. या कलियुगात प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या समस्येने दुःखी आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती, त्याचप्रमाणे जेवढी माणसे तेवढी समस्या असे होऊन बसलेय. एका समस्येतून सुटका मिळते तोच दुसरी समस्या समोर येते. कधीकधी हे प्रश्‍न एवढे बिकट होतात की थोरामोठ्यांचा देखील तोल जातो. प्रसंगी माणसे आत्महत्यादेखील करतात. कधीतरी वाटते माणसापेक्षा पशु होणे चांगले नाही का?
स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात गरीबीची समस्या होती. जीवनावश्यक वस्तू मिळवताना बरेच कष्ट करावे लागत. पूर्वीच्या स्त्रिया पूर्णवेळ घर आणि घरातील माणसांसाठी राबत. घराबाहेरील कामे फक्त पुरुषच करायचे. कमावता एकटाच पुरुष असूनही संसाराचा गाडा व्यवस्थित चाले. फक्त लेकुरे उदंड असल्याने अतिरिक्त ताण पडायचा तो वेगळा. हळूहळू परिस्थिती बदलली. स्त्रिया शिकून स्वतःच्या पायावर उभ्या राहून नोकरी करून प्रपंचाचा भार वाहायला मदत करायला लागल्या. पण पूर्वीच्या काळी जे प्राप्त आहे त्यात प्रपंच चालवणारी माणसे आणि आज भरपूर पैसा मिळवून सर्व सुख-सोयींनी युक्त असा प्रपंच करणारी ह्यात सुख किती व कोणाच्या वाट्याला आलेय याचा विचार केलेला बरा!
इतिहासाचा आढावा घेतला तर लक्षात येते की प्रत्येक पिढीनंतर काही ना काही सुधारणा ही होतेच.
आपल्या आजी – आजोबांचे जीवन आणि आपली राहणी यात बराच सुटसुटीतपणा आलेला दिसतो. तरीही माणसाची घुसमट चालूच आहे. प्रत्येकाच्या वयोमानाप्रमाणे वेगवेगळ्या समस्या असतात. आधी लहानांचा विचार केला तर आजचे आई-बाबा नोकरी करून आपल्या मुलांना सर्व गोष्टी उपलब्ध करून देतात. चांगले शिक्षण, उत्तम आहार, उत्तम राहणी सगळे चांगले असूनही आजच्या मुलांसमोर अनेक समस्या उभ्या आहेत. आज खून, बलात्कार, अपहरण या घटनांत वाढ होऊन आजूबाजूला भयावह वातावरण पसरलेले आहे. पूर्वीच्या काळी माणसांना राक्षसांची, भूताखेतांची भीती वाटे, पण आज माणसांची वृत्तीच राक्षसी झालीय. त्यामुळे घरात कितीही सुखसोयी असल्या तरी बाहेरील वातावरण आपण बदलू शकतो का? म्हणजे आलेच ना दुःख?
आता मोठ्या माणसांची मोठी दुःखे असतात. आजची स्त्री घर, नोकरी, मुले सगळे सांभाळूनही समाधानी आणि सुरक्षित नाही, तेही स्वतःच्या घरात आणि बाहेरही, वयोवृद्ध माणसे तर शरीर अस्वास्थ्यामुळे कंटाळलेली असतात. कुणी काही म्हटले की पटकन राग येतो. खरे तर बालपण आणि म्हातारपण ही एकच अवस्था आहे. फरक असतो तो फक्त वयाचा! त्यांची सर्व कर्तव्ये संपली असल्याने त्यांना प्रतीक्षा असते ती कधी हे श्‍वास संपतील याची. म्हणजे काळ कुठलाही असो, एक गोष्ट मात्र खरी की जगात पूर्ण सुख कधीच लाभत नाही. मग तो रस्त्यावरचा भिकारी असो किंवा लाल दिवा मिरवत जाणारा सत्ताधारी. सुख हे जगाच्या बाजारात विकत मिळत नाही. म्हणूनच ज्याच्यापाशी काही नाही तोही दुःखी आणि सगळे असूनही ते एक दिवस संपेल याची काळजी करणाराही दुःखीच.
पण खरे पाहता कुठलीही समस्या किंवा दुःख हे जास्त काळ टिकत नसते. माणूस जिवंत असेपर्यंत रोज नवीन समस्या त्याच्यासमोर येतच राहणार. गरज आहे ती आलेल्या परिस्थितीसमोर तटस्थपणे उभे राहण्याची. जगात पूर्ण सुखी कोणीही नसले तरी आलेली दुःखे दूर करण्याचे अनेक मार्ग असतात. जेव्हा आपण खूप दुःखी होतो, मग कारण कुठलेही असो, त्यावेळी जमले तर तिथून लांब जावे म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात किंवा एखाद्या तीर्थक्षेत्रात. त्याने मनाची शक्ती वाढते आणि प्रसंगी आपला तोल ढळत नाही.
कधीतरी एकांताचा आनंद घ्यावा, कारण एकांतात फक्त संवाद असतो आपल्या मनाशी आणि आत्मपरीक्षण करायला सोपे जाते. आणखी एक पर्याय म्हणजे आपल्याला जे आवडेल ते करावे. कधीकधी माणसाला कर्तव्यपालनात हवे ते करता येत नाही. अशावेळी संधीचे सोने करून अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण कराव्यात. म्हणजे आलेल्या दुःखाचा भार हलका होईल. काही माणसे आपल्या समस्या दुसर्‍यांना सांगतात किंवा भरपूर रडतात, त्याने कधीकधी दुःख हलके होते.
पण काही व्यक्तींना परिस्थिती बदलता येत नाही आणि त्यापासून लांबही पळता येत नाही. त्यामुळे गोष्टी अगदीच विकोपाला जातात. अशावेळी टोकाची भूमिका न घेता मौन पाळावे. सत्संग धरावा. पॉझिटिव्ह मणसांच्या सहवासात रहावे. पण कधी तरी माणसे दुःखाच्या एवढ्या आहारी जातात की, त्यांना काहीच सुचत नाही. काय चांगले नि काय वाईट यातला फरकच कळत नाही. अन् नकळत पाय वळतात ते स्वतःला संपवायला आलेल्या परिस्थितीतून सुटका करायला. पण आत्महत्या ही वाट नसून पळवाट आहे.
जेव्हा माणसाला काहीही सुचत नाही, तेव्हा शेवटचा पर्याय म्हणून पूर्ण शरणागती पत्करावी. आपली सगळी दुःखे, समस्या ईश्वराला समर्पित करावे. समर्पण म्हणजे अपर्ण करणे, जे आहे ते तुझे आहे आणि तूच मला यातून सोडव, अशी केलेली एक शुद्ध प्रार्थना एक अति विनवणी परमेश्‍वरापर्यंत नक्कीच पोहोचेल, कारण आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे. त्या एकमेव शक्तीवर आपला पूर्ण विश्‍वास ठेवून निवांत आणि शांत रहावे आणि जर त्या अंशाला जाणीव झाली की मी परमेश्‍वराचा अंश म्हणजेच परमेश्‍वर आहे तर मग सुख आणि दुःख असे द्वंद्व उरणार नाही.
दुःख उगाळत राहिल्याने कधीही कमी होणार नाही. सद्गुरू सांगतात, समस्येमध्ये चित्त ठेवल्याने समस्या आणखीनच वाढते. म्हणून मन दुसरीकडे रमवावे. शेवटी सुख आणि दुःख हे आपल्याच मनाचे खेळ आहेत. आपण कुठल्याही प्रसंगी एकच गोष्ट ध्यानात ठेवावी की, जीवन हा एक प्रवास आहे आणि तो आपल्याला आनंदाने संपवायचाय. भले त्यातील प्रवासी आपल्या आवडीचे असोत किंवा नसोत. प्रत्येकाला सुखाचा सदरा हा आपला आपणच शिवावा लागतो हेच खरे!