कुटबण, मोबोर जेटीवरील कॉलराची साथ नियंत्रणात

0
3

>> साथनियंत्रण विभागाचे डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांची माहिती

दक्षिण गोव्यातील कुटबण आणि मोबोर मच्छिमारी जेटीवरील कॉलराची साथ संपुष्टात आली आहे, अशी माहिती आरोग्य खात्याच्या साथनियंत्रण विभागाचे डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी काल दिली.

कुटबण आणि मोबोर जेटीवरील कॉलराच्या उद्रेकामुळे खळबळ उडाली होती. तसेच काही मच्छिमारांचा कॉलराची लागण झाल्यामुळे मृत्यू झाला होता. याशिवाय दोनशेच्या आसपास मच्छिमारांना कॉलराची लागण झाली होती. यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कुटबण मच्छिमारी जेटीला भेट देऊन पाहणी करून सरकारी अधिकाऱ्यांना स्वच्छतेबाबत आवश्यक निर्देश दिले होते. त्यानंतर कुटबण, मोबोर येथे स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. जेटीवर राहणाऱ्या मच्छिमारांना अतिरिक्त स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात आली होती. पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा, मच्छिमारीमंत्री नीळकंठ हर्ळणकर यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन जेटीवर नांगरून ठेवलेल्या नादुरुस्त बोटी हटविण्याचे निर्देश दिले होते.

दक्षिण गोव्यातील दोन्ही बाधित भागात गेल्या 12 दिवसांत एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही. कुटबण आणि मोबोर येथील कॉलराच्या साथीमुळे एकूण 6 जणांचा बळी गेला आहे, तर 228 कॉलराचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यात कुटबण येथे 128 आणि मोबोर येथे 50 रुग्णांचा समावेश होता. कॉलराची लागण झालेल्या सर्व जणांची प्रकृती सुधारली आहे, असेही डॉ. बेतोडकर यांनी सांगितले.

कॉलराची साथ रोखण्यासाठी स्वच्छता राखणे आवश्यक आहे. जेटीवरील कामगारांनी स्वच्छतागृहाचा वापर करावा, तसेच परिसरात स्वच्छता राखून कॉलराची साथ पुन्हा पसरणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असेही डॉ. बेतोडकर यांनी सांगितले.