कुचेलीत दोन दुचाकींत अपघात; एक ठार, एक जखमी

0
4

शनिवारी मध्यरात्री क्रिकेट खेळून घरी येताना कुचेली म्हापसा येथील कचरा प्रकल्पाजवळ दोन दुचाकी एकमेकांवर आदळल्याने झालेल्या अपघातात 26 वर्षीय आरोन फर्नांडिस (मायणा- शिवोली) याचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या ऋग्वेद बांदोडकर (वय 21 वर्षे, रा. कुचेली) याच्यावर सध्या गोमेकॉत उपचार सुरू आहेत. हे दोघेही मित्र असून ते आपापल्या दुचाकींवरून जात होते.

हा अपघात शनिवारी मध्यरात्री घडला. आरोन आणि ऋग्वेद हे (जीए 03 एएस 8246) आणि (जीए 03 एक्यू 4796) या दुचाकींवरून तीन माड सडयेहून कुचेली येथे एकमेकांशी बोलत येत होते. कुचेली कचरा प्रकल्पासमोरील उतरणीवर त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दोघांच्याही दुचाकी एकसमान चालत असल्याने त्यांची एकमेकांना धडक बसली. परिणामी दोन्ही दुचाकी रस्त्याच्या कडेला कलंडल्या. त्यात दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले.

जखमींना म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल केले असता डॉक्टरांनी आरोन फर्नांडिस याला मृत घोषित केले, तर ऋग्वेद बांदोडकर याला पुढील उपचारासाठी गोमेकॉत भरती केले आहे. या अपघाताची माहिती म्हापसा पोलिसांना मिळताच म्हापसा पोलीस हवालदार शिवाजी शेटकर यांनी पंचनामा केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आदित्य गाड हे करीत आहेत.