उत्तरप्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करणारा कुख्यात गुंड विकास दुबे पोलीस चकमकीत ठार झाला आहे. दुबेला अटक केल्यानंतर विशेष पथक त्याला कानपूरला घेऊन जात होते. यावेळी पोलिसांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात झाला. त्याचवेळी शेजारी असलेल्या पोलिसांची बंदूक घेऊन तो पळून जाण्याच्या बेतात होता. त्यावेळी विकास दुबेला आत्मसमर्पण करण्यास सांगितले. या दरम्यान झालेल्या चकमकीत पोलिसांनी दुबेला ठार केले. विकास दुबेचा मृत्यू झाल्याची माहिती पीटीआयने दिली आहे.
जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्याचा मृत्यू झाला. या चकमकीत दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले. मध्यप्रदेशातील उज्जैन येथे विकास दुबेला अटक करण्यात आली होती. गेल्या आठवड्यापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. त्याच्यावर पाच लाखांचे बक्षीस देखील जाहीर करण्यात आले होते.