>>होंडा खून प्रकरण : जखमी मुलीची धक्कादायक जबानी
होंडा – तिस्क येथील स्वत:च्या मुलीचा अमानुषपणे खून केलेल्या शंकर रेड्डी याने प्राणघातक हल्ल्यापूर्वी तिच्यावर बळजबरीचा प्रयत्न केल्याची धक्कादायक जबानी गोमेकॉत उपचार घेत असलेल्या जखमी मॉंगौरीने पोलिसांना दिली आहे. आपल्या कुकर्माचा भांडाफोड होणार या भीतीनेच स्वत:च्या दोन्ही मुलींचा काटा काढण्याचा वडिलांचा प्रयत्न होता असेही तिने सांगितले आहे.
हल्ल्यावेळी मॉंगौरी ही लहान मुलगी माथेफिरू बापाच्या तावडीतून सुटून पळाल्याने वाचली होती. खून करण्यापूर्वी शंकरने सुजाता या थोरल्या मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी आपण वडिलांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने रागाच्या भरात पहिल्यांदा आपल्यावर कोयत्याने सपासप वार केले. सुदैवाने आपण पळून गेल्याने वाचले. मात्र, मोठी बहीण सुजाताला त्याने ठार केले असे मॉंगौरीने दिलेल्या जबानीत म्हटले आहे. आपले वाईट कृत्य लपवण्यासाठी घरात मुलींना भेटण्यासाठी अज्ञात मुलगा येत होता ही वडिलाने दिलेली जबानी खोटी असल्याचे तिने पोलिसांना सांगितले आहे.
सुजाताला मृत्यूने ओढून आणले
शंकरला दोन मोठे मुलगे, दोन मुलगी व पत्नी असा परिवार आहे. एक मुलगा त्याच्याबरोबर पेटिंगचे काम करीत होता. पण वडिलांच्या वागणुकीला कंटाळून गोवा सोडून भोपाळला दुसरा मुलगा राहत असलेल्या मूळ घरी तो गेला. सुजाता ही भोपाळला १२ वी पर्यंत शिकली होती. तीन महिन्यांपूर्वीच ती आपल्या आईकडे होंडा येथे राहायला आली होती. होंड्यात एका खासगी केंद्रात ती संगणक शिकत होती. ती बीएड अभ्यासक्रमासाठी गोव्यात आली होती. पण जन्मदात्या बापानेच ठार केल्याने तिला मृत्यूनेच येथे ओढून आणले होते अशी चर्चा आहे.
शंकरकडून पत्नीची छळवणूक
शंकर आपल्या पत्नीला नेहमी मारहाण करीत होता. त्याच्या अत्याचाराला कंटाळून त्याची पत्नी आपल्या मुलींना घेऊन बिर्हाड बदलत होती. सुरूवातीला ती चिंबल नंतर म्हापसा, सोनूस, होंडा व सध्या होंडा – तिस्क येथे बिर्हाड थाटले होते. ही सर्व ठिकाणे शोधून शंकरने पत्नीला छळले होते. होंड्यातील ठिकाणही शंकरला सापडल्याने गेल्या दीड महिन्यांपासून कुटुंबासोबत राहून तो पत्नीला मारझोड करीत होता. त्यामुळे नवर्याच्या जाचाला कंटाळून ती भोपाळला गेली होती. तिच्या गैरहजेरीत मुलींवर खुद्द जन्मदात्याचीच वाईट नजर गेल्याने एका मुलीला जीव गमवावा लागला.