कुंभमेळ्याची रोमांचकारी सफर

0
3
  • गो. रा. ढवळीकर

या यात्रेत आम्हाला पदोपदी थरार अनुभव आला. आलेल्या कठीण प्रसंगातून सुरक्षित बाहेर कसे पडायचे याची चिंता करीत असताना ठिकठिकाणी मनुष्यरूपाने प्रत्यक्ष देवच भेटत गेला आणि त्याने आमची त्या-त्या प्रसंगातून सुटका केली. त्या कठीण प्रसंगातून बाहेर पडतानाचा आनंद अवर्णनीय असाच होता. त्या गंगेची सारी कृपा.

कुंभमेळ्याच्या बातम्या वृत्तपत्रांत आणि समाजमाध्यमांत झळकू लागल्या आणि त्या वाचून कुंभमेळ्याला जाण्याची जबरदस्त इच्छा निर्माण झाली. एरव्ही गर्दीच्या ठिकाणी जत्रेला जाण्याचे मी टाळत असतो, परंतु कुंभमेळ्याच्या गर्दीत जाण्यास मी का तयार झालो माझे मलाच कळत नाही. मी सश्रद्ध जरूर आहे, परंतु अंधश्रद्ध मुळीच नाही. त्यामुळे कुंभमेळ्याला जाऊन त्रिवेणी संगमावर स्नान केल्याने केलेली पापे नष्ट होतील अथवा अन्य काही लाभ होईल अशी अपेक्षा मुळीच नव्हती, तर या कुंभमेळ्याला लाखो, करोडो लोक येतील, त्यांची राहण्याची, जेवणखाणाची आणि इतर व्यवस्था उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मा. आदित्यनाथ योगी यांनी कशी केली आहे, तो लाखोंचा समुदाय त्या प्रयागराजच्या तीर्थक्षेत्रात कसा वावरतोय आणि त्या गंगा, जमुना, सरस्वती या तिन्ही नद्यांच्या संगमावर भक्तगण स्नानाचा आनंद कसा लुटताहेत हे प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा निर्माण झाली. माझे वय 86 आणि पत्नीचे 77 असूनही मुलांनी आम्हाला विरोध केला नाही. उलट आमचा धाकटा मुलगा प्रीतम हा आमच्याबरोबर यायला तयार झाला.

नोव्हेंबर महिन्यात आम्ही अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले होते. वाराणसी व प्रयागला आम्ही त्यावेळी जाऊ शकलो नाही म्हणून यावेळी आम्ही वाराणसीवरून प्रयागला जायचे ठरवले. प्रयागला आणि वाराणसी, अयोध्या या तिन्ही ठिकाणी अलोट गर्दी उसळत चालल्याच्या आणि काही अपघातांच्याही बातम्या कानावर येत होत्या. त्यामुळे आम्हालाही अशा अचडणींना तोंड द्यावे लागू शकेल ही जाणीव मनात होतीच. परंतु ज्या परमेश्वराने ही इच्छा मनात निर्माण केलेली आहे तोच सर्व काळजी घेईल, हा पूर्ण विश्वास बाळगून 12 फेब्रुवारीला मी, माझी पत्नी सौ. यामिनी आणि मुलगा प्रीतम असे आम्ही तिघे या महाकुंभयात्रेला निघालो आणि ठायी ठायी आम्हाला आमचा विश्वास सार्थ असल्याचा अनुभव आला.

प्रथम आम्ही वाराणसीला गेलो. तिथे आम्ही काशी विश्वनाथ मंदिराजवळच हॉटेलमध्ये खोली आरक्षित केली होती. आम्ही वाराणसी विमानतळावर उतरलो तर तिथे टॅक्सी उपलब्ध नव्हत्या. शेवटी एक टॅक्सी मिळाली. तो सांगेल ते पैसे दिले, परंतु तो हॉटेलपर्यंत जाऊ शकला नाही. हॉटेलपासून सहा कि.मी. अंतरावर पोलिसांनी त्याला अडवले. त्यापुढचे तीन कि.मी. अंतर आम्ही ऑटोरिक्षाने पार केले. त्यापुढे ऑटोरिक्षांनाही बंदी होती. त्यापुढचे अंतर एकतर चालत जायचे अथवा माणूस हाकणाऱ्या रिक्षातून जायचे. तसल्या रिक्षात बसणे पसंत नसूनही मनाविरुद्ध ते पाप आम्ही केले आणि चार तासांनंतर त्या अफाट गर्दीतून वाट काढीत रात्री 8 वा. हॉटेलवर पोहोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही काशी विश्वनाथाच्या दर्शनाला जाणार होतो. पहाटे जाग आली ती रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांच्या घोषणांनी. तेव्हापासून गर्दीला सुरुवात झाली होती. आम्ही सकाळी न्याहारी आटोपून, आंघोळ करून 8 वा. दर्शनाला बाहेर पडलो तर रस्त्यावर गर्दीचा महापूर… रस्त्यावर पाय ठेवायलाही जागा नव्हती. ‘जय भोलेनाथ’, ‘बम्‌‍ बम्‌‍ भोले’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. त्या गर्दीतून वाट काढीत दर्शनाला जाणे मोठे अवघड काम होते. हॉटेल मॅनेजर म्हणाला होता की, दर्शनाला 6-7 तास लागतील. आम्हाला दर्शन देणे हे केवळ त्या विश्वनाथाच्या हाती होते. गंमत म्हणजे हॉटेलमध्ये न्याहारी घेताना मडगावचे दोन प्रवासी आम्हाला भेटले. ते म्हणाले की, रांगेत राहू नका. गेट नं. 4 वर चला. तिथे महनीय व्यक्तींना प्रवेश दिला जातो आणि क्वचित वयस्कर व्यक्तींना. आम्ही गर्दीतून वाट काढीत कसेबसे गेट नं. 4 वर पोचलो. परंतु गर्दी वाढल्यामुळे त्यांनी तिथून प्रवेश देणे बंद केले होते. आम्ही तेथील सुरक्षारक्षकांना खूप विनवणी केली, परंतु ते कसेच ऐकेनात. आम्ही बराच वेळ तिथून हललो नाही. जाणार तरी कुठे? ते पाहून एक अधिकारी तिथे प्रगट झाला आणि तो आम्हाला घेऊन आत गेला. पंधरा मिनिटांत आम्हाल
ा विश्वनाथाचे दर्शन घडले हा चमत्कारच म्हणायचा. सकाळच्या वेळी दर्शन करून आणि ज्ञानव्यापीचा व मंदिराचा सुंदर परिसर पाहून आम्ही खोलीवर आलो.
पंतप्रधान मोदींनी त्या परिसराचा केलेला विकास आणि तिथले अनेक घाट पाहण्यास आम्ही संध्याकाळी गेलो. तिथे नौकाविहाराचा आनंद आम्हाला घेता आला. बोटीतून आम्ही तिथे पेशवे, भोसले यांसारख्या अनेक महनीय व्यक्तींनी बांधलेले सुंदर घाट पाहिले. प्रवाशांनी तुडुंब भरलेल्या शे-दीडशे बोटी, होड्या नदीतून विहार करतानाचे ते दृश्य पाहून डोळ्यांचे पारणे फिटले. रात्री होणारी गंगेची आरती मात्र आम्हाला पाहायला मिळाली नाही. अफाट गर्दी लोटत असल्याने शासनाने काही दिवस आरती बंद केली होती.

14 फेब्रुवारी रोजी आम्ही वाराणसीहून प्रयागला टॅक्सीने जायला निघालो. हे 120 कि.मी.चे अंतर पार करायला साधारणपणे अडीच-तीन तास लागतात. 12 तारीखची पौर्णिमेच्या पवित्र स्नानाची गर्दी ओसरली असल्यास आम्ही प्रयागला वेळेवर पोचू अशी अपेक्षा होती. परंतु अद्याप गर्दी कमी झाली नसल्याने काही रस्ते बंद होते. आम्ही अर्धे अंतर पार केल्यावर ड्रायव्हर म्हणाला, ‘हा रस्ता पुढे बंद आहे. दुसऱ्या रस्त्याने घेतो. तासभर उशीर होईल.’ त्या रस्त्याने जाऊन त्याने आम्हाला तीर्थक्षेत्रापासून सुमारे दहा कि.मी. एवढ्या अंतरावर आणून सोडले. पुढचे अंतर ऑटोरिक्षा अथवा भाड्याच्या मोटरसायकलवरून करावे लागणार होते. आम्ही रिक्षावाल्यांना विचारले तर ते म्हणाले, ‘आज रिक्षा सोडत नाहीत. तुम्ही मोटरसायकलने जा.’ दुपारचे 12 वाजले होते आणि डोक्यावर सूर्य तळपत होता. परंतु दुसरा पर्याय नसल्याने आम्ही चार मोटरसायकली ठरवल्या. आम्ही तिथे तीन मोटरसायकलीवर बसलो आणि चौथ्या मोटरसायकलला सामान बांधले. काही अंतर रस्त्यावरून गेल्यावर मोटरसायकलींनी रस्ता सोडला आणि बाजूच्या पायवाटेवरून जाऊ लागल्या. आम्हाला थोडी भीती वाटली. हे आम्हाला कुठे नेताहेत हे समजेना. नदीकाठाने गेलेली ती खडबडीत वाट होती. प्रचंड धक्के बसत होते. या वाटेने जाऊन तुम्हाला जवळ नेऊन सोडतो, मग थोडे अंतर चालावे लागेल असे ते म्हणाले. रस्ते वाहनांकरिता बंद असल्याने आम्हाला अशा आडवाटेने जावे लागते असे त्यांनी सांगितले. रणरणत्या उन्हात मोटरसायकलींवरून केलेला तो खडतर प्रवास खूप त्रासदायक झाला. आम्ही ते धक्के कसे सहन केले सांगता येणार नाही. त्यांनी आम्हाला नियोजित स्थानापासून पाच कि.मी. अंतरावर आणून नागेश्वर घाट या घाटावर सोडले. तिथे एकही वाहन नव्हते. तिथून पुढे पाच कि.मी. चालत जायचे. प्रसंग कठीण होता. आमची बोबडी वळली. आता काय करायचे? एवढे अंतर चालत जाणे शक्यच नव्हते. डोकीला हात लावून बसलो आणि हे नको असलेले धाडस या वयात केल्याबद्दल स्वतःला दोष देत बसलो. या चिंताग्रस्त परिस्थितीत अर्धा तास उलटला आणि अचानक एक रिक्षा आमच्यासमोर येऊन उभी राहिली. रिक्षातून प्रवासी उतरल्यानंतर आम्ही त्या रिक्षाकडे गेलो तर तो म्हणाला, मी तुम्हाला मुक्कामापर्यंत नेऊ शकेन की नाही माहीत नाही. प्रयत्न करतो. आमच्या जिवात जीव आला. आम्ही रिक्षात बसलो. रिक्षावाल्याच्या रूपात आम्हाला देवच भेटला होता. त्यानेही आम्हाला कुठल्या कुठल्या आडरस्त्यांनी नेऊन एकदाचे मुक्कामी पोचवले तेव्हा कुठे जीव भांड्यात पडला. कुंभमेळ्याला जाणे एवढे खडतर असेल असे वाटले नव्हते. परंतु ज्यांच्याकडे रिक्षा, मोटरसायकला द्यायला 500, 1000 नव्हते असे लाखो लोक पंधरा-वीस कि.मी. अंतर डोक्यावरून सामान घेऊन संगमाकडे जाताना पाहिले आणि त्यांच्या मानाने आमचे त्रास काहीच नव्हे असे जाणवले.

रखरखत्या उन्हात वाट काढीत आम्ही चिन्मय मिशनच्या तंबूंच्या शिबिरात पोचलो. वाळूवर बांधलेले चारही बाजूंनी बंद असलेले तंबू. तंबूत गेलो आणि गरमीने हैराण झालो. तंबूत पंखे नव्हते आणि असून काय उपयोग? कारण दिवसभर वीजपुरवठा बंद. संध्या. 6 वा. वीजपुरवठा सुरू व्हायचा आणि सकाळी 6 वा. बंद व्हायचा. रात्रभर दिवे चालू. ते बंद करण्याची व्यवस्था नव्हती. प्रयागचे हवामान असे होते की दिवसा खूप गरमी आणि रात्री कडाक्याची थंडी. गरमी आणि थंडी दोन्ही असह्य. तिथल्या व्यवस्थापकांनी आम्हाला चांगली जाडजूड दोन ब्लँकेट्स दिल्याने आम्ही कडाक्याची थंडी सहन करू शकलो. दिवसा वारा जोरात वाहत असे, परंतु तो तंबूत येत नसे. येत असे ती वालुकामय धूळ. आमचे कपडे, बॅगा, अंथरुणे धुळीने माखून निघाली होती. बाथरूम, संडास कपड्याचेच बनवलेले व वरून उघडे होते. आत कोणी गेले आहे का पाहणार तर हाक द्यावी लागे.

एकूणच त्या तीर्थक्षेत्रात योगीजींनी राहण्याची व्यवस्था कशी केलेली आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. नदीच्या पात्राच्या बाजूला मोठाली वाळवंटे आहेत. म्हणजे नदीचे पात्र 1 कि.मी. असेल तर दोन्ही बाजूला तीन-चार कि.मी. रुंदीचा वाळवंटी प्रदेश आहे. दोन्ही बाजूंना सुमारे 20-22 कि.मी. लांबीच्या किनाऱ्यावर ही तंबूंची शहरे वसवली आहेत. ये-जा करण्यासाठी लांब-रूंद-सरळ रस्ते आहेत. त्या वालुकामय प्रदेशात डांबरी अथवा काँक्रीटचे रस्ते बनवणे शक्य नसल्याने अर्धा-पाऊण इंच जाडीचे लोखंडी पत्रे लांब खिळ्यांनी जमिनीवर ठोकून रस्ते बनवले आहेत. रस्त्याच्या बाजूंनी वीजवाहिन्या आणि पाण्याच्या वाहिन्या टाकलेल्या आहेत. पाण्याचा अखंड पुरवठा चालू असतो. भारतातल्या सर्व स्वामी व योग्यांनी आणि धार्मिक संस्थांनी तिथे हजारोंच्या संख्येने तंबूंची शिबिरे चालवून लाखो भक्तांची राहण्याची आणि जेवणखाणाची व्यवस्था केलेली आहे. यामध्ये हिंदूंच्या चारही धर्मपीठांचे स्वामी तसेच इतर अनेक स्वामी, नागा साधूंचे आखाडे आणि विश्व हिंदू परिषद, सनातन संस्था, रामकृष्ण मिशन इ. अनेक संस्थांची शिबिरे पाहायला मिळाली. उत्तर प्रदेश सरकारनेही अनेक ठिकाणी गरिबांची सर्व सोय केल्याचे समजते. या शिबिरांमध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या निदान तीस-चाळीस लाख असावी आणि मुक्काम न करता संगमावर येऊन आंघोळ करून त्याच दिवशी परतणाऱ्या लोकांची संख्या त्याहून खूप असे.

आम्ही राहत होतो तिथून संगम 5 कि.मी. अंतरावर होता. दिवसरात्र भक्तगणांची रस्त्यावरून ये-जा चालू. रस्ते गर्दीने फुललेले असत. ठिकठिकाणी पाण्याची व संडास-बाथरूमची व्यवस्था होती. पोलिस व मार्गदर्शक केंद्रे होती. सकाळी खूप थंडी असल्याने आम्ही 10 वा. संगमावर जायला निघालो. 3 कि.मी. जायला आम्हाला रिक्षा मिळाली. 2 कि.मी. अंतर पायी चालत गेलो. होडीने संगमस्थळी जायचा विचार होता, परंतु गर्दी वाढल्याने होडी प्रवास बंद ठेवण्यात आला होता आणि आजूबाजूच्या रस्त्यांनी संगमावर जायचे तर आणखी अडीच-तीन कि.मी. चालत जावे लागले असते. आम्हाला जिथे गंगा, यमुना व सरस्वती या नद्यांचा त्रिवेणी संगम होतो ते स्थळ 200 मी.वर समोर दिसत होते. परंतु तिथे पोचणे आम्हाला अवघड होते. उन्हाने आणि चालून आल्याने जीव घाबराघुबरा झाला होता म्हणून आम्ही उभे होतो. त्याच संगम घाटावर आंघोळ करण्याचा निर्णय घेतला. तरुणमंडळी संगमावर जात होती आणि तिथे मोठी गर्दी उसळली होती. पोलिस ध्वनियंत्रणेवरून वारंवार घोषणा करून लोकांना परत जाण्यास सांगत होते. आम्हीही आंघोळ करून लवकरच बाहेर पडलो. त्या संगमावरच्या पाण्यात आंघोळ करण्याचा आनंद काही वेगळाच होता. आम्ही तिथपर्यंत पोचू की नाही ही शंका होती, परंतु ईश्वराने आम्हाला बळ देऊन तिथपर्यंत नेऊन स्नान घडवले. तो आनंद अविस्मरणीय म्हणावा लागेल.
आम्ही जिथे आंघोळ केली तिथले पाणी स्वच्छ होते, आणि संगमावरचे पाणी खूप लोकांनी आंघोळ केल्यामुळे अस्वच्छ झाले होते असे समजले. तरी सरकारने ठिकठिकाणी पाणी शुद्धीकरणाच्या यंत्रणा बसवल्या होत्या आणि शुद्धीकरणाचे काम सतत चालू होते. परंतु लोकांच्या प्रचंड संख्येपुढे सर्व योजना अपुऱ्या पडत होत्या. इतके असूनही त्या प्रचंड परिसरात कुठेच घाण दिसली नाही. रस्ते व परिसर सरकारी यंत्रणांनी स्वच्छ राखला होता. कचरा उचलण्याचे, तसेच संडासातील मैला उचलून नेण्याचे काम अहोरात्र चालू होते. या स्वच्छतेच्या कामाबद्दल प्रशंसा करावी तेवढी थोडीच. कारण ते केले नसते तर रोगराई पसरली असती.
आंघोळ आटोपून आम्ही पुन्हा चालत मुख्य रस्त्यावर आलो. परंतु परत जाण्यासाठी रिक्षा मिळेना. तास- दीड तास उलटला. काही वेळाने आमच्या समोरच एक रिक्षा उभी राहिली. परंतु तीही एका गृहस्थांनी काबीज केली. रिक्षावाल्याने आम्हाला नकार दिला. परंतु त्या रिक्षेत बसलेला देवमाणूस त्याच्यावर ओरडला आणि त्याने आम्हाला घ्यायला त्याला भाग पाडले. उन्हाने आणि चालत आल्याने आम्ही गर्भगळीत झालो होतो आणि डोके गरगरू लागले होते. अशा अवस्थेत एक देवमाणूस आम्हाला भेटला, ज्याने आम्हाला मुक्कामापर्यंत सोडले.

दोन दिवस प्रयाग तीर्थक्षेत्री मुक्काम झाल्यानंतर आम्ही परतीचा विचार करू लागलो. तिसरा दिवस रविवारचा होता आणि सुटीचा दिवस असल्याने गर्दी तिप्पट वाढली होती. रस्त्यावरून रात्रीचेदेखील पायी चालणाऱ्यांचे लोंढेच्या लोंढे सुरू झाले होते. रस्त्यांवरून जनसागरच वाहत होता. वाहने कुठे दिसत नव्हती. आमचे विमान सोमवारी सकाळी 8.30 वाजताचे होते. ते गाठण्यासाठी रात्री निघावे लागणार होते व त्यावेळी वाहन मिळणे अशक्य होते, म्हणून मी प्रयाग चिन्मय आश्रमाच्या प्रमुख मा. शाश्वतीजी यांना फोन करून आमची अडचण सांगितली आणि थोड्या वेळासाठी आमची आश्रमात व्यवस्था करण्याची विनंती केली. आश्रमातील सर्व खोल्या भरलेल्या असतानाही त्यांनी आमची विनंती मान्य केली.
आश्रमाकडून विमानतळाकडे जाण्यास वाहन मिळणे सुलभ होते म्हणून रविवारच्या त्या प्रचंड गर्दीतून वाट काढीत आश्रमात जाण्यास निघालो. आश्रमात जाण्यासाठी आम्हाला तीन टप्पे पार करावे लागणार होते. शिबिरापासून दारागंज, दारागंज ते बँक रोड आणि बँक रोड ते आश्रम असे ते तीन टप्पे होते. तंबूतून बाहेर आल्यावर एक रिक्षा मिळाली. दारागंजपर्यंत जाण्यासाठी त्याने मागितलेले एक हजार रुपये मान्य करून आम्ही रिक्षात बसलो. सुमारे तीन कि.मी. गेल्यावर त्याने आम्हाला उतरवले व हेच दारागंज आहे असे सांगून तो निघून गेला. तिथे एक पोलिस चौकी होती. त्यांच्याकडे चौकशी केली तर तो म्हणाला, दारागंज अजून दोन कि.मी. दूर आहे. ‘तिथे कसे जायचे?’ माझा प्रश्न. तो म्हणाला, ‘चालत जायचे.’ मी कपाळावर हात मारला आणि तिथे एक खुर्ची होती त्यावर बसकण मारली. पत्नी उभीच होती आणि मुलगा काही वाहन मिळते का पाहत होता. काही वेळ गेल्यानंतर त्या पोलिसाने मला प्रश्न केला, ‘आप कहाँ से आये हो?’ मी म्हटले, ‘गोवा से.’ ‘ओह, गोवा से? गोवा तो बहुत सुंदर है और गोवा के लोग भी बहुत अच्छे हैं। मैं गोवा को गया था तब मुझे लोगों ने बहुत मदद की।’ आमच्या गप्पा सुरू झाल्या एवढ्यात मोटरसायकलवरून जाणाऱ्या एका तरुणाला त्याने थांबवले व त्याला तो म्हणाला, ‘इनको दारागंज को छोड दो।’ आम्ही तिघे आहोत असे मी पोलिसाला म्हटले तर तो म्हणाला, ‘आप चिंता मत करो। आप हमारे मेहमान हैं। ये यहाँ के लोग हरामी हैं। लोगों को लुटते है।’ तेवढ्यात मोटरसायकलवरून एक पोलिस आला. त्यालाही त्याने थांबवले आणि आम्हाला दारागंजला नेण्यास सांगितले. एका मोटरसायकलवर समोर बॅग ठेवून मी व माझी पत्नी बसलो, आणि दुसऱ्या मोटरसायकलवर दोन बॅगा घेऊन माझा मुलगा प्रीतम बसला. आम्हाला पोलिसाच्या रूपात देवच भेटला होता. दारागंजला आम्हाला गर्दी असूनही मोटरसायकली मिळाल्या आणि आम्ही दुसरा टप्पा पार केला. तिसराही टप्पा रिक्षाने पार करून एकदाचे आश्रमात पोचलो.

आश्रमात सातआठ तास मुक्काम करून आम्ही रात्री दहा वाजता विमानतळावर निघण्याची तयारी केली. कारण ऐनवेळी टॅक्सी मिळणे कठीण होते. दहा वाजता बोलावलेली टॅक्सी गर्दीतून वाट काढीत बारा वाजता आली व आम्ही दीड वाजता विमानतळावर पोचलो. परंतु विमानतळावर आत प्रवेश मिळेना. उड्डाणाच्या वेळेच्या आधी फक्त तीन तास अगोदर प्रवेश दिला जाईल असे सांगण्यात आले. बाहेर कडाक्याची थंडी होती आणि शेकडो प्रवासी त्या थंडीत कुडकुडत बाहेर उभे होते. खूप जणांनी तिथल्या सुरक्षा अधिकाऱ्यांना विनंती करून पाहिली, परंतु ते हुकूमाचे ताबेदार असल्याने त्यांनी आपली असमर्थता प्रगट केली. हळूहळू सगळ्यांनीच बाहेर जिथे जागा मिळेल तिथे आपली पथारी लावली व त्या थंड फरशीवर हळूहळू आडवे झाले.
प्रयागचा विमानतळ तसा छोटा आहे. तिथे रात्रीची विमान वाहतूक बंदच होती. आगमन (अीीर्ळींरश्र) आणि निर्गमन (ऊशर्रीीीीिंश) या दोन्ही भागात सामसूम होती. तास- दीड तास उलटल्यानंतर एक अधिकारी बाहेर आला आणि त्याने सुरक्षा-रक्षकांना आज्ञा केली, ‘यांना आगमन कक्षात बसवा!’ आम्ही आमची बाहेरची पथारी आवरून आत गेलो त्यामुळे थंडीच्या त्रासापासून आमची सुटका झाली. उरलेली रात्र तिथे बसून प्रवाशांनी काढली. साडेसहापासून विमानांची ये-जा सुरू झाली. आम्हाला साडेसहाला प्रवेश मिळाला आणि सर्व सोपस्कार पूर्ण करून आम्ही 7 वा. विमानाच्या गेटपाशी आलो. सुदैवाने विमान वेळेवर आले आणि आम्ही नियोजित वेळी गोव्यात पोचलो.

आम्ही खरेच भाग्यवान म्हणून 144 वर्षांनी होणाऱ्या महाकुंभमेळ्याला जाण्याचे आणि आदित्यनाथ योगींनी थोड्याच कालखंडात उभारलेल्या साम्राज्याचे जवळून दर्शन घेता आले. खरोखरच धन्य ते योगी महाराज, ज्यांनी एवढ्या मोठ्या सोहळ्याचे नियोजन करून ते अमलात आणले. कोटींच्या कोटी लोकांची जेवणखाणाची, निवासाची, प्रवासाची आणि सुरक्षेची व्यवस्था करणे तसे सोपे नव्हते. आतापर्यंत जगात कुठेही न झालेला एवढा मोठा उत्सव आयोजित केल्याबद्दल सर्व जगाने मुख्यमंत्री योगींचे कौतुक केले.

घरी पोचलो आणि नातेवाईक, मित्रमंडळी भेटायला येऊ लागली. या प्रवासात इतरांना काय अनुभव आले माहीत नाही पण आम्हाला मात्र पदोपदी थरार अनुभवायला मिळाला. आलेल्या कठीण प्रसंगातून सुरक्षित बाहेर कसे पडायचे याची चिंता करीत असताना ठिकठिकाणी प्रत्यक्ष देवच भेटत गेला आणि त्याने आमची त्या-त्या प्रसंगातून सुटका केली, असे मला वाटते. पत्नीने व मुलाने समर्थपणे, न डगमगता साथ दिली म्हणूनच एवढ्या म्हातारपणी आम्ही ही यात्रा यशस्वीपणे पूर्ण करू शकलो आणि गंगास्नानाचा अपूर्व आनंद मिळवू शकलो. यात्रेत खूप त्रास झाला, परंतु ईशकृपेने सुरक्षित घरी पोचलो. त्या कठीण प्रसंगातून बाहेर पडतानाचा आनंद अवर्णनीय होता. फक्त वाहनातून सुरक्षितपणे जाणे, डुबकी मारणे आणि तसेच परतणे यात विशेष ते काय? ते थरारक प्रसंग नातेवाइकांना सांगताना आणि लिहिताना माझा आनंद द्विगुणित झाला. त्या गंगेची सारी कृपा. ‘जय गंगे भागीरथी!’ ‘हर गंगे भागीरथी!’