>> हरभजन सिंगने उधळली ‘जंबो’वर स्तुतिसुमने
फलंदाजांनी धावांचा डोंगर उभा केला तरी गोलंदाजांनी २० गडी बाद केले नाहीत तर कसोटी सामना जिंकता येत नाही, असे भारताचा माजी ऑफस्पिन गोलंदाज हरभजन सिंग याने सांगितले. क्रिकेट हा खेळ सुरुवातीपासून फलंदाजांच्या बाजूने झुकलेला आहे. त्यामुळे गोलंदाज खरे ‘मॅच विनर’ ठरतात. भज्जीने हाच निकष लावून सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड अशा दिग्गजांना वगळून भारताचा विक्रमी लेगस्पिन गोलंदाज अनिल कुंबळे याला भारताचा आत्तापर्यंत सर्वांत मोठा ‘मॅच विनर’ म्हणून निवडले आहे.
हरभजनने आपल्या कारकिर्दीतील बहुतांशी वर्षे कुंबळेसोबत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले. कुंबळे कर्णधार झाल्यानंतरही हरभजन त्याच्या नेतृत्वाखाली भारताकडून कसोटी खेळला आहे. कुंबळे निवृत्त झाला त्यावेळीसुद्धा हरभजन कुंबळेसोबत होता.
‘भारताचा सर्वांत मोठा मॅच विनर कुंबळेच होता. कोणतीही खेळपट्टी असली, चेंडू वळत असला किंवा सरळ जात असला तरी आपले सर्वोत्तम प्रदर्शन करून कुंबळे बळी मिळवायचा.’ असे हरभजन म्हणाला. कुंबळे फिरकीपटू नसून मध्यमगती गोलंदाज होता, अशी टीका अनेकवेळा त्याच्यावर व्हायची, परंतु, बळी घेण्यासाठी चेंडू वळवण्याची गरज नसून मोठ्या ह्रदयाची गरज असते, हे कुंबळेने दाखवून दिले होते, असे सांगत भज्जीने कुंबळेचे कौतुक केले.
२००१ साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी कुंबळेला दुखापत झाली होती. त्यामुळे या मालिकेत हरभजनला या मालिकेसाठी संधी मिळाली होती. हीच मालिका हरभजनच्या कारकिर्दीला नवीन दिशा देणारी ठरली होती.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अनिल कुंबळे हा तिसरा सर्वांत यशस्वी फिरकीपटू असून बळींच्या बाबतीत शेन वॉर्न व मुथय्या मुरलीधरन यांच्यानंतर कुंबळेचा क्रम लागतो. कुंबळेच्या नावावर तब्बल ६१९ कसोटी बळी आहेत. २७१ वनडे लढतींत ३३७ बळी कुंबळेने घेतले आहेत. भारताकडून कसोटी व वनडेतील सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम कुंबळेच्याच नावावर जमा आहे. कसोटीच्या एका डावात जिम लेकर यांच्यानंतर दहा बळी घेणारा केवळ दुसरा गोलंदाज होण्याचा मानदेखील कुंबळेने मिळवला होता.