कुंडईत ट्रकच्या धडकेत १ ठार

0
139

मानसवाडा-कुंडई येथे काल सकाळी सव्वा आठच्या सुमारास एका मालवाहू ट्रकला झालेल्या अपघातात एकजण ठार झाला. मालवाहू ट्रक कुंडई मानसवाडा येथील उतरणीवरून खाली उतरत असताना रस्त्याच्या बाजूला गेल्याने दुकानांना आदळल्यामुळे परिसरातील दोन-तीन दुकानांचेही नुकसान झाले आहे. या घटनेची फोंडा पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

याबाबत माहिती अशी की, एमएच-०९ सीयू-१९१९ या क्रमांकाचा मालवाहू ट्रक फोंड्याहून पणजीच्या दिशेने जात होता. कुंडई मानसवाड्यावरील उतरणीवर पोहोचल्यावर ट्रक रस्त्याच्या बाजूला गेला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे रस्त्याच्या बाजूला गेलेला ट्रक डाव्या बाजूला असलेल्या दुकानांवर आदळला. या घटनेत दुकानांचे बरेच नुकसान झाले. दुकानांची छप्परे कोसळण्याबरोबरच भिंतींनाही तडे गेले. पण, सुदैवाने दुकानातील व्यक्तींना इजा झाली नाही.

ट्रक उतरणीवर घरंगळून खाली आला असता तेथे उभ्या असलेला मनोरंजन सुशील दास (वय ५४) हा या ट्रकच्या धडकेमुळे गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने फोंड्यातील जिल्हा हॉस्पिटलमध्ये आणले असता, वाटेतच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. ट्रकचा चालक विवेक भगवंत गायकवाड (रा. कागल-कोल्हापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार रोहिदास भोमकर करीत आहेत.