>> चार पोलीस जखमी; दोघां तरुणांना अटक
कुंकळ्ळी येथे काल पहाटे गस्तीवरील चार पोलिसांवर सातपेक्षा जास्त तरुणांनी दारुच्या नशेत हल्ला केला व तीन पोलीस वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणी काही वेळात मयुर देसाई व शेख अब्दुल रझाक यांना पोलिसांनी अटक केली. इतर पाच जणांच्या शोधात पोलीस आहेत.
कुंकळ्ळी पोलीस स्टेशनाच्या अलिकडे एक किलोमीटर अंतरावरील एका घरासमोर पहाटे ३ वा. ही घटना घडली. तेथील रस्त्यालगत संदिप देसाई याचे घर असून संदिप, मयुर देसाई, शेख अब्दुल रझाक, संतोष देसाई, शुभम बोरकर (चिकु), साईश देसाई, स्वप्तेश देसाई व इतर त्या घराबाहेर दारु पीत बसले होते. पहाटे तीन वाजता महामार्गावरुन गस्त घालणारी पोलीस जीप घेवून पोलीस संजय काशिनाथ गांवकर, जीप चालक आकाश गांवकर तेथे पोहचले व त्यांनी रस्त्यावर दारु पिणार्यांना हटकले. मात्र ते पोलिसांना दुरुत्तरे देवू लागल्याने एकास त्यांनी जीपमध्ये कोंबण्याचा प्रयत्न केला. इतक्यात इतर सर्व धांवत तेथे आले. या जीपचालकने रॉबर्टला फोन करुन बोलावले, तेही काही मिनिटांत पोहचले. तसेच पोलीस स्टेशनवरील जीपही पोहचली. इतक्यात त्या तरुणाने काठ्या घेवून पोलिसांवर व वाहनांवर हल्ला केला. या हल्ल्यात संजय गांवकर, प्रमोद कोठारकर, महेश नाईक, आकाश नाईक हे पोलीस जखमी झाले.