किशोरवयीन मुले आणि प्रसार माध्यमे

0
4158

(भाग – २)
– डॉ. सुषमा किर्तनी (शिशू, बाल व किशोररोगतज्ज्ञ)
मागील अंकात आपण किशोरवयीन मुला-मुलींच्याजीवनातील माध्यमांचे महत्त्व आणि त्याचा त्यांच्या शिक्षण, आहार, व्यक्तिमत्त्व, आहारविषयक समस्या आणि व्यसने तसेच लैंगिक वर्तणूक आणि हिंसा या बाबींवर होणारा परिणाम याबद्दल पाहिले. आज आपण या माध्यमांचा मुलांच्या शरीरावर होणारा परिणाम याविषयी जाणून घेऊया.
शरीरावर होणारे विविध परिणाम : 
१) डोळ्यांवरील ताण
२) पोस्चर समस्या
३) एपिलेप्सी
४) इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स
सतत लॅपटॉप आणि टीव्हीचा वापर केल्यामुळे बर्‍याच किशोरवयीन मुलांच्या डोळ्यांवर ताण पडून नंतर दृष्टीवर फरक पडतो. त्यामुळे टीव्ही बघताना एक गोष्ट पालकांनी लक्षात ठेवायची की मुलाला टीव्हीपासून २ मीटर अंतरापेक्षा जवळ बसू देऊ नये. तसेच वाजवीपेक्षा जास्त वेळ कीबोर्डचा वापर किंवा व्हिडिओगेम्स खेळताना सतत बटणं दाबणे यांमुळे सतत ताण पडून बोटांना इजा होते.
बर्‍याच किशोरवयीन मुलांना संगणकावर काम करताना चुकीच्या स्थितीत बसल्यामुळे मानदुखी, पाठदुखीचाही सामना करावा लागतो. तसेच त्यांना इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स (किरणांबाबत) विषयी जागरूक करणे महत्त्वाचे आहे. कुठल्याही इलेक्ट्रिक उपकरणांच्या जवळ बसण्यामुळे त्याच्या किरणांचा त्याच्यावर परिणाम होतोच. टीव्ही किंवा व्हिडिओ खेळांमधील उजेड किंवा प्रकाश सतत हालत असल्यामुळे (कमी-जास्त होत असल्यामुळे) जास्त वेळ त्याच्या जवळ बसणार्‍या एपिलेप्टिक म्हणजेच फिट् (झटका) येणार्‍या मुलांना फिट् येऊ शकते.
इंटरनेटच्या रूपात अस्तित्वात येणारे माध्यम :-
मुलांच्या संगणक आणि टीव्हीच्या अतिवापरामुळे कदाचित पालक अगदी कंटाळून गेले असतील किंवा ते या नवीन आवश्यक अशा शिक्षणाच्या माध्यमाचे कौतुकही करत नसतील, पण इंटरनेट हे नक्कीच किशोरवयीन मुले व तरुणांकरता भरपूर शैक्षणिक माहिती पुरविण्याची क्षमता असणारे उपकरण असून ते एक प्रचंड घरगुती वाचनालय आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
इंटरनेट वापराचे किशोरवयीन मुलांना होणारे फायदे ः-
१) अमर्याद माहिती पुरवणारा स्रोत
२) सहज परवडणारा व उपलब्ध
३) त्यांच्या शिक्षकांशी संवाद साधणे शक्य करणारा.
४) इ-मेल व व्हिडिओ लिंकद्वारे ते संवाद साधू शकतात.
५) मनोरंजनाचे स्रोत
इंटरनेटच्या वापरामुळे उद्भवणारे धोके:-
१. जास्त वेळ इंटरनेटचा वापर केल्यामुळे मुलांना त्याचं व्यसनच जडतं.
२. हे शाळेच्या कामामध्ये किंवा कार्यालयीन कामामध्ये व्यत्ययही आणू शकतं.
३. जास्तीत जास्त वेळ इंटरनेटवर घालविल्यामुळे त्या मुलांचा समाजाशी, मित्रमैत्रिणींशी आणि आईवडिलांशी संवाद कमी होऊन जातो.
४. सतत बसून राहिल्यामुळे मुलांचे वजन वाढते तसेच शरीराच्या अवस्थेच्या समस्या निर्माण होतात.
५. किशोरवयीन मुलांमध्ये इंटरनेटच्या अति वापरामुळे त्यांना लैंगिक विषयांवरील माहिती मिळवण्याचा मोह होण्याचा खूप धोका असतो.
इंटरनेट माध्यमांच्या वापराबाबत काय करू शकतो?-
अमेरिकन ऍकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स या संस्थेने असा सल्ला दिला आहे की या मुलांना दररोज दोन किंवा तीन तासांपेक्षा जास्त वेळपर्यंत या माध्यमांसमोर बसू द्यायचे नाही. याचाच अर्थ मुलांना टीव्हीवरील हिंसक दृश्ये किंवा कार्यक्रम बघायला दिले नाही आणि त्या माध्यमांचा अतिवापर करू दिला नाही व त्याबद्दल प्रोत्साहित करत राहिल्यास त्यांच्यामध्ये सकारात्मक मूल्ये आकार घेऊ लागतील. त्यासाठी पालकांनी कोणते उपाय अवलंबिले पाहिजेत-
१) तुमची मुले कोणते कार्यक्रम बघतात ते जाणून घ्या.
२) जेव्हा तुम्ही अगदी लहान बाळांना सांभाळत असता तेव्हा त्यांना घेऊन कधीही टीव्ही, व्हिडिओगेम्स किंवा व्हिडिओचा वापर करू नका.
३) दिवसभरात १ ते २ तासच या माध्यमांची वापर करण्याची मर्यादा पाळा.
४) असा नियम करा की मुलांनी घरचा अभ्यास पूर्ण केल्याशिवाय तसेच जेवताना त्यांना टीव्ही, संगणक कशाचाच वापर करता येणार नाही.
५) मुलांच्या झोपण्याच्या खोलीत टीव्ही राहणार नाही याची खबरदारी घ्या.
६) तुमचा मुलगा काय बघतो आहे ते तुम्हीही बघा.
७) तुम्ही त्याच्यासोबत कार्यक्रम बघत असताना त्याच्याशी बोला, त्याच्याशी संवाद साधून रहा.
८) झोपण्याच्या थोडा वेळ अगोदर टीव्ही बघणे बंद करा नाहीतर झोपेपर्यंत टीव्ही बघत राहिल्यास भावना त्यातील व्यक्तींशी जोडल्या जाऊन झोप लागणे कठीण होईल.
९) तुमचे टीव्ही पाहणे सुद्धा मर्यादित ठेवून मुलांसमोर एक आदर्श उदाहरण ठेवा.
एक बालरोगतज्ज्ञ या मुलांसाठी काय करू शकतो?-
या मनोरंजन करणार्‍या माध्यमांचा अति प्रमाणात वापर करण्यामुळे बालक तसेच किशोरवयीन मुलांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो याबद्दल बालरोगतज्ज्ञाने जागरूक राहून वेळोवेळी मुलांना व त्यांच्या पालकांना त्याची जाणीव करून दिली पाहिजे, तसेच किशोरांना किंवा तरुणांना वाहन हळू चालविण्याबद्दल, अपघाताबद्दल, तसेच वॉट्‌सऍप, फेसबूकसारखी माध्यमे वापरताना काय सावधगिरी बाळगली पाहिजे याबद्दल डॉक्टरांनी सांगितले पाहिजे. त्याशिवाय मुलांनी या माध्यमांचा वापर कमी करून त्या वेळात निरनिराळे मैदानी खेळ खेळले पाहिजेत. स्थूलपणाची समस्या टाळण्यासाठी एका जागेवर बसून राहणे टाळावे तसेच टीव्हीवरील हिंसक कार्यक्रम जास्त वेळ पाहू नयेत याविषयी मुलांना सल्ला दिला पाहिजे. त्याऐवजी किशोरवयीन मुला-मुलींनी फॅशन, हिंसक कार्यक्रम आणि वाईट संदेश देणारे चित्रपट पाहण्याऐवजी धार्मिक कार्यक्रम, योगा, आहारविषयक आणि आरोग्याशी संबंधित कार्यक्रम बघण्यावर भर दिला पाहिजे.
पालकांना बालरोगतज्ज्ञांनी असा सल्ला द्यायला हवी की मुलांसोबत तुम्हीही कार्यक्रम बघा, विचार करण्यास प्रवृत्त करणारे कार्यक्रम निवडा आणि मुलांची झोपण्याची खोली माध्यममुक्त ठेवा. जे बालरोगतज्ज्ञ त्यांच्या क्लिनिकच्या वर्‍हांड्यांत टीव्ही लावतात त्यांनी त्यावर हिंसा नसणारे म्हणजे अहिंसक कार्यक्रम दाखवले पाहिजेत. तसेच पालकांना मार्गदर्शन करून त्यांच्या मुलांसाठी त्यांनी कोणत्या कार्यक्रमांची आणि माध्यमांची किती प्रमाणात निवड केली पाहिजे त्याविषयी कार्यक्रम राबविले पाहिजेत.