कुठ्ठाळी येथील कोंबड्यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये दोघा इसमांनी जबरदस्तीने घुसून तेथील दोन कामगारांशी किरकोळ वादातून हल्ला केला. त्यात एका 23 वर्षीय कामगाराचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार चालू आहेत. गुरुवारी दुपारी ही घटना घडली. अनिल मुथामाझी असे मृत तरुणाचे नाव आहे, तर झुसया मंडल (39) हा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी वेर्णा पोलिसांनी इंदर मल्लिक (22) आणि नलिका मंडल (35) यांना अटक केली आहे.
पोलीस उपअधीक्षक गुरुदास कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी 12.30 च्या सुमारास ही घटना घडली. कुठ्ठाळी-जांबोल येथे अँथनी सिक्वेरा यांचा ‘अँथनी पोल्ट्री फार्म’ आहे. गुरुवारी दुपारी पोल्टी फार्मवर दोन अज्ञात इसम आले. त्यांनी अनिल व झुसया यांच्याशी वाद घालत थेट सुरीने सपासप वार केले. त्यात गंभीर जखमी झालेल्या अनिलचा जागीच मृत्यू झाला, तर झुसया याच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. फुकट कोंबडी न दिल्याच्या रागात हा हल्ला झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. मात्र या हल्ल्यामागे आणखी वेगळे कारण असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.