>> सीआयआय गोवाची कामगारमंत्र्यांकडे मागणी
राज्यातील कुशल आणि अकुशल कामगारांचे किमान वेतन वाढविण्याचा निर्णय स्थगित ठेवण्याची मागणी भारतीय उद्योग महासंघ गोवाने (सीआयआय) कामगारमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्याकडे केली आहे.
कामगार मंत्री मोन्सेरात यांनी गोव्यातील कुशल आणि अकुशल कामगारांच्या किमान वेतनात वाढ करण्याबाबत वक्तव्य केले आहे. या पार्श्वभूमीवर सीआयआय गोवाच्या एका शिष्टमंडळाने मोन्सेरात यांची भेट घेऊन त्यांच्याशी किमान वेतनाबाबत चर्चा केली. सीआयआयने शेजारील राज्यांमधील कामगारांच्या वेतनाचा तुलनात्मक अभ्यास सादर केला. तसेच गोव्यातील कामगारांचे किमान वेतन इतर राज्यांच्या तुलनेत जास्त असल्याचे निदर्शनास आणून दिले.
राज्यातील कामगारांच्या किमान वेतनात वाढ केल्यास त्याचा उद्योगांवर विपरित परिणाम होईल, असे मत सीआयआयच्या गोवा शाखेच्या अध्यक्ष स्वाती साळगावकर यांनी व्यक्त केले.
यावेळी मंत्री मोन्सेरात यांनी सीआयआयला राज्यातील व्यवसाय सुलभतेसाठी जास्तीत जास्त पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. कोविड-१९ महामारीमुळेे उद्योजकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. तसेच वीज दरात झालेली वाढ आणि कच्च्या मालाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे राज्यातील व्यवसायांवर विपरित परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील किमान वेतनात आणखी वाढ केल्यास व्यवसायावर नकारात्मक परिणाम होईल, असे सीआयआयने म्हटले आहे.