>> गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचा आरोप
समुद्रकिनाऱ्यावरील शॅकचालकांचा मनमानी कारभार सुरू आहे. शॅकचालकांकडून सर्व नियमांचे उल्लंघन केले जात आहे. पर्यटन खात्याचे शॅकचालकांवर कोणतेही नियंत्रण नाही. शॅक भाडेपट्टीवर घेतलेल्या व्यक्तींकडून हे शॅक परराज्यातील लोकांना चालविण्यासाठी दिले जातात. एखाद्या नागरिकाने शॅकचालकांच्या मनमानी कारभाराबद्दल जाब विचारल्यास त्याच्यावरच हल्ला केला जातो. हरमल समुद्र किनाऱ्यावरील अमर बांदेकर याच्या खून प्रकरणाला राज्य सरकारच जबाबदार आहे, असा आरोप गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी पक्ष मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल केला.
पर्यटन खात्याकडून समुद्रकिनाऱ्यावर शॅकचे वितरण केल्यानंतर शॅकचालकांच्या कारभारावर कोणतेही नियंत्रण ठेवले जात नाही. हरमल समुद्रकिनाऱ्यावर 12 शॅकचे वाटप करण्यात आले होते, त्यापैकी 10 शॅक परप्रांतीय लोक चालवत आहेत.राज्य सरकारकडून स्थानिकांना व्यवसाय करण्यासाठी शॅक दिले जातात; मात्र सदर शॅक परराज्यातील लोकांना भाडेपट्टीवर दिले जात आहेत. अमर बांदेकर याने शॅकचालकांच्या बेकायदा गोष्टींच्या विरोधात आवाज उठल्याने त्याच्यावर हल्ला करून त्याचा खून करण्यात आला. अमर याच्यावर अनेकांनी हल्ला केला; मात्र पोलिसांकडून कारवाई मोजक्याच संशयित व्यक्तींविरोधात होत आहे, असा आरोप पाटकर यांनी केला.
राज्यात पर्यटनात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होत आहे. परप्रांतीयांकडून शॅकच्या व्यवसायाच्या नावाखाली बेकायदा कामे केली जातात. किनाऱ्यावर 20 पलंग घालण्यासाठी परवानगी दिली जाते; मात्र त्यांच्याकडून मर्यादेपेक्षा जास्त पलंग घातले जातात. त्यामुळे किनाऱ्यावर फेरफटका मारणारे नागरिक आणि पर्यटकांना अडथळा निर्माण होत आहे, असेही पाटकर यांनी सांगितले.