किनार्‍यांवरील शॅकच्या नुकसानीचा आढावा घेणार : पर्यटनमंत्री

0
101

राज्य सरकार ओखी चक्री वादळामुळे दक्षिण आणि उत्तर गोव्यातील समुद्रकिनार्‍यावरील शॅक आणि इतर मालमत्तेचे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहे, असे पर्यटन मंत्री मनोहर आजगांवकर यांनी काल सांगितले.

ओखी चक्री वादळामुळे राज्यातील समुद्र किनार्‍यावरील शॅक व मच्छिमारांचे मोठे नुकसान झाले आहे, नुकसानीचा आढावा घेण्यासाठी खास अधिकार्‍याची नियुक्ती केली जाणार आहे. पर्यटन मंत्री आजगांवकर यांनी समुद्र किनार्‍यावर झालेल्या शॅक व इतर मालमत्तेच्या नुकसानीची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली आहे. शॅक मालकाना झालेल्या नुकसानीवर गांर्भियाने विचार करून योग्य निर्णय घेतला जाणार आहे, पर्यटन खात्याचे अधिकारी एकंदर परिस्थितीचा आढावा घेत आहेत. तसेच पर्यटक व नागरिकांनी सुमद्रात जाऊ नये, अशी सूचना मंत्री आजगांवकर यांनी केली आहे.

समुद्रकिनार्‍यावरील नुकसानीचा
अहवाल कामास सुरूवात
उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांनी नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार करण्याच्या कामाला सुरूवात केली आहे. उत्तर गोव्यातील पेडणे आणि बार्देश तालुक्यातील समुद्र किनार्‍यावरील शॅक व इतर मालमत्तेच्या नुकसानाची आढावा स्थानिक मामलेदारांकडून घेतला जात आहे. उत्तर गोव्यात या वादळामुळे जीवित हानी झालेली नाही. तलाठ्यांनी समुद्र किनार्‍यावरील देशी व विदेशी पर्यटकांना समुद्रात न उतरण्याची सूचना केली आहे.

मच्छिमारांना तीन दिवस समुद्रात न जाण्याची सूचना करण्यात आली आहे. मोरजी, मांद्रे, हरमल आणि केरी किनार्‍यावरील ५० शॅकचे नुकसान झाले आहे. बार्देशमधील हणजूण आणि बागा समुद्रकिनार्‍यावर झीज झाली आहे. नेरूल येथील कोको किनार्‍यावरील संरक्षक भिंतीची हानी झाली आहे. उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी नीला मोहनन यांनी नुकसानीचा अहवाल सरकारला सादर केला आहे. नुकसान झालेल्या शॅक मालकांना सरकारकडून नुकसान भरपाई दिली जाणार आहे. दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकार्‍यांनी ओखी वादळामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार करून सरकारला सादर केला आहे. सासष्टी तालुक्यात प्राथमिक अहवालानुसार शॅक मालकांचे ३० लाखांचे नुकसान झाले आहे. वार्का येथे ५ शॅक, कासावली येथे ६ शॅक मोठे, तर ७ शॅकचे कमी नुकसान झाले आहे. उतोर्डा येथे २, बाणावली येथे ५ शॅकचे मोठे तर ९ शॅकचे कमी नुकसान झाले आहे. दक्षिण गोव्यात वादळामुळे मनुष्य हानी झालेली नाही. महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांकडून पर्यटकांना सर्तक करण्याचे काम करण्यात आले. मुरगाव तालुक्यात शॅकची हानी झाल्याची तक्रार नाही. बायणा किनार्‍यावर फ्लोटींग जेटीची हानी झाली आहे. काणकोण तालुक्यात सुध्दा मोठे नुकसान झालाची माहिती प्राप्त झालेली नाही.