किनारे स्वच्छता घोटाळा प्रकरणी लोकायुक्तांचा अहवाल स्वीकारा

0
157

राज्यातील किनार्‍यांची साफसफाई करण्याच्या कंत्राटात मोठा घोटाळा झालेला आहे असा गोवा लोकायुक्तांनी जो अहवाल दिलेला आहे तो सरकारने विनाविलंब स्वीकारावा आणि त्यासंदर्भात आवश्यक ती पुढील कारवाई करावी, अशी मागणी काल कॉंग्रेसने केली.
पक्षाचे प्रवक्ते यतीश नाईक हे यांसबंधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, लोकायुक्ताने जो किनार्‍यांची स्वच्छता करण्यासाठीच्या कंत्राटात घोटाळा झाल्याचा अहवाल दिलेला आहे त्यासंदर्भात तीन महिन्यात अभ्यास करून पुढील कारवाई करण्यात येईल असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांचे हे म्हणणे मान्य न करण्यासारखे आहे. लोकायुक्तांची सरकारनेच स्थापना केलेली आहे. लोकायुक्त ही स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे त्यांनी दिलेल्या अहवालावर तीन महिने अभ्यास करण्याची आवश्यकता नसल्याचे नाईक यावेळी बोलताना म्हणाले.
किनारा साफसफाई घोटाळ्याबरोबरच, शापोरा रिव्हर फ्रंट घोटाळा, मच्छीमारांना ओळखपत्रे देताना झालेला घोटाळा असे एक-एक घोटाळे पुढे येऊ लागले असल्याचे नाईक यांनी यावेळी सांगितले. किनार्‍यांची साफसफाई करण्यासाठीच्या कंत्राटात जो घोटाळा झालेला आहे त्या प्रकरणी लोकायुक्तांनी दिलेल्या अहवालावर सरकारने लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी नाईक यांनी यावेळी केली.