>> मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट; किनारी भागात रात्रीची गस्त वाढवणार
किनारपट्टी भागात रात्री 10 नंतरही कर्णकर्कश संगीत चालू असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होत असल्याच्या तक्रारी उत्तर गोवा किनारपट्टी भागातून येऊ लागल्या असून, या पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागात रात्री 10 नंतर कर्णकर्कश संगीतावर पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे. त्यासाठी तेथे देखरेखीसाठी पोलीस कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवण्यात येणार आहे. याशिवाय काही किनारपट्टी भागात गुंडगिरी वाढल्याने पोलिसांना रात्रीची गस्त वाढवण्याचा आदेशही देण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.
कांदोळी येथील किनाऱ्यावर पशुवैद्यकीय डॉक्टरांना बेदम मारहाण करण्याची घटना, तसेच कळंगुट येथे तिघा तरुणींची छेड काढण्याची घडलेली घटना आणि टिटो लेनमधील एका क्लबमध्ये दोघा भावांवर तेथील कर्मचारी व बाऊन्सर्सकडून झालेला हल्ला या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बोलत होते.
रात्रीच्या वेळी किनारपट्टी भागातील पोलीस स्थानकांवर मोठ्या संख्येने पोलिसांना रात्रीची गस्त घालण्यासाठी पाठवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
किनारपट्टी भागांत वाढत चाललेल्या गुंडगिरीच्या पार्श्वभूमीवर काल गृह खात्याची एक तातडीची बैठक झाली. या बैठकीत राज्यात वाढत चाललेल्या गुंडगिरी मोडून काढण्याबाबत चर्चा झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. किनारपट्टी भागांत यापुढे रात्री 10 नंतर कर्णकर्कश संगीत वाजवण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढील आठ दिवसांत पोलिसांच्या बदल्या
आठवडाभरात राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या मोठ्या संख्येने बदल्या करण्यात येणार आहेत. पोलीस खात्यात शिस्त आणणे व गुंडगिरी नियंत्रणात आणण्यासाठी हे आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. शिपायांच्या बदल्या करण्याचे काम यापूर्वीच सुरू झालेले आहे. उपअधीक्षक, निरीक्षक व उपनिरीक्षक यांच्या बदल्या करण्याचे काम पुढील आठवडाभरात हातात घेण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी
सांगितले.
रेस्टॉरंट, क्लबचालकांना नियम पाळण्याच्या सूचना
काही पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात घडलेल्या अनुचित प्रकारांच्या पार्श्वभूमीवर उत्तर गोवा पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी किनारी भागातील रेस्टॉरंट आणि क्लब व्यवस्थापकांसोबत काल बैठक घेऊन त्यांना ध्वनिप्रदूषण टाळण्याचे व इतर कायद्यांचे योग्य पालन करण्याच्या सूचना केल्या. याशिवाय पर्यटकांशी योग्य वर्तन करण्याचे निर्देश दिले. गोव्याला भेट देणाऱ्या पर्यटकांशी योग्य रीतीने व्यवहार करण्यासाठी आणि त्यांच्याशी गैरवर्तन न करण्यासाठी कर्मचाऱ्यांना सूचना द्याव्यात, जेणेकरून गोव्याला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी सुरक्षित आणि आनंददायी वातावरण निर्माण होण्यास मदत होईल. आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे पडताळणी अर्ज सादर करण्याचा सल्ला देण्यात आला. क्लब, रेस्टॉरंट मालकांना संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही पाळत ठेवण्याचा सल्ला देण्यात आला. गोव्याला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन अक्षत कौशल यांनी केले. यावेळी पर्वरीचे उपअधीक्षक विश्वेश कर्पे आणि पोलीस निरीक्षक राहुल परब यांची उपस्थिती होती.