काही शब्दांची उत्पत्ती व त्यामागचा विनोद

0
30
  • – महेश पारकर

तर अशा या टोप्या स्वतःच्या डोक्यात चढवतात. तसेच एकजण दुसर्‍याच्या डोक्यावरतीसुद्धा चढवतो. परंतु प्रेमाने! दुसर्‍याला घातलेल्या टोपीचा अर्थ मात्र लोकांमध्ये भलत्याच अर्थाने रूढ झालेला दिसतो…

आजचा काळ तसा वेगवेगळ्या प्रकारच्या, कलाकुसरीच्या टोप्या डोक्यावरती घालण्याचा. तसेच वेगवेगळ्या रिंग्ससारख्या वस्तू घालून कान, नाक, गळे सजविण्याचा. भोवताली नजर टाकल्यास आम्हाला टोप्यांचे व अन्य रिंग्ससारख्या वस्तूंचे अनेक प्रकार बघायला मिळतात. तसेच कानामध्ये आभूषणे घालून मिरविणारी कित्येक माणसे भेटतात. स्त्रिया-पुरुष सगळेच. हे सगळे प्रकार फॅशन म्हणून करतात, आवड म्हणूनही करतात. यामागे इतरांचे लक्ष स्वतःकडे खेचून घ्यायचा उद्देश असतो. तर काहीजण दुसरा करतो म्हणून स्वतः करतो. केवळ मनाच्या समाधानासाठी. करेना का! अशामुळे टोप्या बनविणार्‍याचा तसेच कानांतील आभूषणे बनविणार्‍यांचा थोडा फायदा झाला तर होईना का!?
टोप्यांचे विविध प्रकार किंवा कानांतल्या आभूषणांच्या प्रकाराबद्दल मी पुढे माहिती सांगणार आहे असा अंदाज जर तुम्ही बांधला असेल तर त्यात तुमची काहीच चूक नाही. वास्तविक मला स्वतःच्या डोक्यावरती टोप्या घालायचा किंवा कानामध्ये आभूषणे चढवायचा अजिबात शौक नाही. लहानपणापासून माझ्या लक्षात आहे ती वडिलांची काळी टोपी. वडील कुठे घरातून दूरगावी जायला बाहेर पडले की ती डोक्यावर घालायचे, अन्यथा ती सदैव खुंटीवरतीच टांगलेली असायची. क्वचितच वडील ती वापरात आणत असल्यामुळे टोपी ही फक्त खुंटीवर टांगायचीच एक वस्तू असा माझा समज त्या वयात झाला होता. वडिलांच्या धाकामुळे टोपीला हात लावायला मात्र मी धजत नसे. परंतु टोपी घालणे म्हणजे दुसर्‍याला फसविणे किंवा लबाडी करणे! हा भावार्थ समजायला पुढे कित्येक वर्षे जावी लागली.

टोपी म्हटली की लगेच आठवते ती गांधी टोपी. गांधीजींनी एकदा ती डोक्यावरून खाली उतरवली. आयुष्यात पुन्हा कधीच परत ती डोक्यावर चढवली नाही. परंतु गांधीजींचे नाव लावणारी ती टोपी अखिल भारतीय राजकारणात फारच प्रतिष्ठेचे स्थान मिळवून राहिली. ती डोक्यावर चढविली तर सत्तेच्या खुर्चीपर्यंत जायचा रस्ता मोकळा होतो अशी धारणा या देशात अनेक दशके होती. सध्या तिची जागा काळ्या टोपीने घेतलीय. तर ते असो! तर अशा या टोप्या स्वतःच्या डोक्यात चढवतात. तसेच एकजण दुसर्‍याच्या डोक्यावरतीसुद्धा चढवतो. परंतु प्रेमाने! दुसर्‍याला घातलेल्या टोपीचा अर्थ मात्र लोकांमध्ये भलत्याच अर्थाने रूढ झालेला दिसतो.
माझ्या दुकानात अनेक प्रकारच्या स्वभावाचे लोक येतात. दोन ओळखीची माणसे तिथे भेटली की त्यांच्या खबरींना भलताच ऊत येतो. इथल्या-तिथल्या खबरींबरोबर काहींची वैयक्तिक संभाषणेसुद्धा कानावर पडतात. ऐकणं टाळायचं म्हटलं तरी काही केल्या टाळता येत नाहीत अशी स्थिती! ‘‘अरे त्यानं मला काजू-बियांच्या देवघेवीत व्यवस्थित टोपी घातली. नंतर माझ्या ते लक्षात आलं!’’ असाच एकजण दुसर्‍या व्यक्तीकडे आपली कैफियत मांडत होता, ‘‘अरे परवा मी आंबे घेतले. वर-वर सगळे चांगले मोठे आंबें तर खाली सगळे बारीक-सकडे आंबे. ‘काय भुललासी वरलीया सोंंगा’ या उक्तीप्रमाणे डझनभर आंबे पॅक करायला सांगितले. ते घरी घेऊन आल्यानंतर सगळा प्रकार समजला. तसेच ते घेऊन परत आलो. बघतो तर त्याने तिथून पळ काढला होता. मेल्याने माझ्या चांगलेच कानात घातले!’’
माणसाचं डोकं तसेच कानाशी संबंधित हे दोन संवाद. त्या संबंधाचा अर्थ एकप्रकारे फसवणुकीबरोबर लावलेला स्पष्ट आहे. नवीन लग्न झालेली नवरा-बायको उखाणा सांगून शब्दांची रंगत वाढवितात, तसेच हे संवादाला अधिक गोडवा देणारे वाक्प्रचार. टोपी घातली, कानात घातलं अशा वाक्याची मिसळण बोलण्यात केली की तसे संवाद व तो माणूस कायम लक्षात उरतो. मुख्य म्हणजे निर्माण होणार्‍या व्यंगामुळे हास्याला वाव मिळतो. कदाचित अशा प्रयोजनामुळेच हे वाक्प्रचार आपल्या भाषांमध्ये रुळले असावेत, भाषांचेच झाले असावेत. टोपी घालणे किंवा कानात घालणे या शब्दांचा खोल अर्थ शालेय किंवा विद्यार्थिवर्गाच्या लवकर पचनी पडणारा वाटत नाही. एकदोनदा फसवणुकीला बळी पडल्यानंतर किंवा अनवधानाने दुसर्‍याची फसवणूक केल्यानंतर या शब्दांचा गर्भितार्थ चांगलाच लक्षात राहतो. मी लहानपणी हे शब्द बोलणार्‍याच्या तोंडून ऐकून त्यांचा अर्थ शोधताना त्याचे डोके व कान बघायचो. पुढे एका भाजीवालीकडून फसवणूक झाल्यानंतर दुसर्‍या भाजीवालीने त्याबाबत ‘कानात घातलं तुझ्या’ असा उद्धार केला तेव्हा त्या वाक्याचा नेमका अर्थ लक्षात येऊ शकला.
आणखीन एक असाच विनोदी प्रकार पाहूया. हॉटेलात जाऊन चहा वगैरे प्यालो की आपण सरळ प्यालो म्हणायच्या ऐवजी ‘चहा मारली’ असे का व कधीपासून म्हणायला लागलो हे कळायला मार्ग नाही. तसेच बारमध्ये जाऊन ‘प्यालो’ म्हणणार्‍यास ऐकणारा बावळटच या अर्थाने का बघायला लागतो. कारण बारमध्ये जाऊन ‘मारूनच’ येणं होतं, इतका हा शब्द भारदस्त पदावरती पोहोचलेला आहे. बारमध्ये जाऊन येणार्‍याला पिण्याची लज्जत वाढविणारा वाटू लागतो किंवा पट्टीच्या पिणार्‍यांना तो शब्द तसा वाटत असावा. म्हणून असे हे शब्द-वाक्प्रचार भाषेची खासियत बनतात. समजा ‘मारून आलो’ असं एखाद्या नवख्या किंवा बिगरगोमंतकीयाने ऐकले तर काय मजा होईल! त्याचा काय समज होईल… बारमध्ये जाऊन कुणाला मार देऊन तर आला नाही ना? विनोदाचा भाग सोडा, पण हे असं होऊ शकतं.

डोक्याचे केस कापणारा हा गोव्यात कधीच केस कापीत नसतो तर तो मारतो. इथंही हे मारणेच का? पिण्याचं मग तो चहा असो किंवा दारू! त्याचा अन् केस कापण्याचा दुरान्वये तरी संबंध आहे का? बहुधा कुणीतरी व्यक्तीने कोणा एकेकाळी केस कापण्याच्या क्रियेला मारले असं संबोधन केलं असणार. अन् संवादामुळे येणार्‍या सहज हास्याच्या आविष्कारामुळे मुखावाटे त्या शब्दाचे प्रसारण कोकणी भाषेत पुढे सर्वत्र झाले असावे! मुळात बोलण्यातून उद्भवणारे व्यंग व त्यामुळे होणारा हास्याचा लाभ हा अशा वाक्प्रचारांचा जन्मदाता ठरू शकतो, हा भाषाशास्त्राचा नियम आहे.
एकदा एक तरुण स्कूटर पार्क करून फोनवरती भर रस्त्यात बोलत होता. ‘अग मी केस मारीत होतो- केस मारीत होतो…’ बहुधा तो लवकर घरी येत नसल्यामुळे घरच्या मंडळीना त्याची चिंता होत असावी. ‘आधी तिथे गर्दी होती म्हणून मी नेटवर जाऊन बसलो.’ त्याच्या या बोलण्यावर घरच्यांचा विश्‍वास बसत नसावा म्हणून तो वारंवार ‘अगं मी केस मारीत होतो. त्याआधी मी नेटवर होतो’ हा खुलासा तो कितीतरी वेळा करीत बोलत होता. मजेची गोष्ट म्हणजे ‘आपला सलून किधर है? मैं जाना चाहता हूँ’ अशी विचारणा करीत दोन व्यक्ती त्याचं डोकं भडकावयाला आल्यासुद्धा! शेवटी तो तरुण त्यांच्यावरती वैतागून त्याच दमात स्कूटर सुरू करीत चालता झाला. केस कापीत होतो या शब्दाऐवजी केस मारतो हा शब्द त्याने वापरल्यामुळे माझ्यासह कितीतरी लोकांचे भरबाजारात मनोरंजन झाले बघा! आहे ना ही भाषेतील शब्दांची कमाल?
तसं बघता टोपी घालणे, कानात घालणे तसेच ‘मारणे’ हे खर्‍या अर्थाने व गूढ अर्थाने नांदणारे वेगवेगळे वाक्प्रचार आहेत. विशेषतः टोपी घालणे, कानात घालणे हे एकमेकांच्या हातात हात घालून सदैव राजकारणात नांदणारे आहेत. एखाद्या नवशिक्याला राजकारणाचे प्राथमिक धडे घेताना या अशा शब्दाची चांगलीच तयारी करून घ्यावी लागते. कारण या क्षेत्रात जवळचा असो किंवा विरोधी! कोण कुठल्या क्षणी कुरघोडी करील, हे शब्द प्रत्यक्षात आणेल याचा भरवसा नसतो. म्हणून सावधानता बाळगली नाही तर धडगत नसते. डोकं व कान हे माणसाचे सख्खे शेजारी अवयव. त्यांचा कधीच भांडण-तंटा नसतो. परंतु त्या अवयवांमुळे प्रसंगानुरूप उद्भवणार्‍या अपभ्रंशात्मक वाक्प्रचारांनी हा असा गोंधळ माजतो. तोच उदाहरणासह दाखविण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न होता.