काही दिवसांची ताटातूट

0
159

प्रिय वाचक,
सर्वप्रथम आपल्याला गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. खरे तर नवे वर्ष ही नव्या संकल्पांची, नव्या चांगल्या गोष्टींची सुरूवात करण्याची वेळ असते. परंतु सध्या जगावर आलेल्या कोरोनाच्या महासंकटामुळे देशभरात लागू झालेल्या संपूर्ण निर्बंधांमुळे या नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून पुढील काही दिवस तरी नवप्रभेचा अंक मुद्रित स्वरूपात आपल्याला उपलब्ध करून देणे आम्हाला शक्य होणार नाही याची विलक्षण खंत वाटते. आमचाही सर्वस्वी नाईलाज आहे.

गेली काही वर्षे तर एकही दिवस सुटी न घेता – अगदी गणेश चतुर्थीला देखील सुटी न घेता वर्षातील 365 दिवस आम्ही नवप्रभा आपल्या भेटीला घेऊन येत होतो. गेले काही दिवस कोरोनाच्या भयावह वातावरणात देखील आपल्यापर्यंत नवप्रभेचा रोजचा अंक पोहोचवण्याची आम्ही आतापर्यंत सर्व धोका पत्करून नितांत धडपड केली. निद्रिस्त राज्य सरकारला पावलोपावली जागवण्याचा प्रयत्न केला. वृत्तपत्र वितरकांची दुकाने बंद असताना देखील, आम्ही दैनिकाचा अंक मुद्रित करू नये असा सरकारचा हट्टाग्रह असताना देखील विविध प्रयत्न करून रोज सकाळी आपल्या घरी अंक येईल असा जास्तीत जास्त प्रयत्न आम्ही आतापर्यंत केला.

परंतु काल मध्यरात्रीपासून राज्यात जारी झालेल्या संपूर्ण निर्बंधांमुळे आणि आमच्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचाही विचार करून यापुढे काही दिवस तरी रोजच्यासारखा अंक प्रकाशित न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मात्र, कोरोनासंदर्भातील आणि इतर महत्त्वाच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अन्य कोणत्या मार्गाचा अवलंब करावा याचा सर्वंकष विचार करून डिजिटल स्वरूपामध्ये अगदी महत्त्वाच्या बातम्या तत्परतेने आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था आम्ही आमच्या नवप्रभा डॉट कॉम या संकेतस्थळावरून केलेली आहे. आपल्याला हे संकेतस्थळ मोबाईलवरही सहजपणे उघडता यावे यासाठी नेहमीच्या त्याच्या स्वरूपात बदल करून साध्या सरळ ब्लॉगच्या रूपामध्ये ते उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

दैनिकाच्या रोजच्या अंकाप्रमाणे ईपेपरच्या स्वरूपातही आम्हाला हा अंक देता आला असता, परंतु त्यासाठी संपूर्ण मनुष्यबळ कार्यरत ठेवणे भाग असते. सध्याच्या परिस्थितीत आमच्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे आम्ही कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष करू इच्छित नाही. ई पेपर काढण्यासाठी सर्वांना कार्यालयात येण्याची सक्ती करून त्यांच्या आरोग्याशी खेळ मांडणे आम्हाला योग्य वाटले नाही. त्यामुळे त्यांना आपापल्या घरातूनच काम करून या बातम्या पाठविण्यास सांगण्यात आले आहे. फापटपसारा नसलेल्या योग्य बातम्यांतून योग्य व अत्यावश्यक माहिती आपल्यापर्यंत डिजिटल रूपात पोहोचतील याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. विविध सोशल मीडियावरून आपण या संकेतस्थळाची लिंक आपल्या इष्टमित्रांना शेअर करू शकता. त्याद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत या बातम्या व अन्य मजकूर जाऊ शकेल. पुन्हा नेहमीच्या स्वरूपात आम्ही आपल्या भेटीला येऊ तेव्हा पूर्वीइतक्याच प्रेमाने आपण आमचे स्वागत कराल असा विश्र्वास आणि खात्री आहे.

ही वेळ आपल्या सर्वांसाठीच अतिशय कसोटीची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना कोरोनासंदर्भात घरीच राहण्याचे केलेले आवाहन सर्वस्वी योग्य आहे. आम्ही त्याचे शंभर टक्के समर्थन करतो. प्रत्येक भारतीयाने त्याचे पालन केलेच पाहिजे. स्वतः बेजबाबदार वागून, विनाकारण घराबाहेर पडणे प्रत्येकाने टाळावे. आपली स्वतःची व आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी.

राज्य सरकारच्या निर्णयांमध्ये मात्र अजूनही एकवाक्यता दिसत नाही. दिवसागणिक परस्पर विसंगत भूमिका मांडली जाते आहे. संपूर्णतः निर्बंध लागू करण्याचा निर्णय जरी सरकारने घेतलेला असला तरी नागरिकांना जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्याची कोणतीही पर्यायी व्यवस्था अद्याप सरकारला करता आलेली नाही. पणजी महानगरपालिकेने पहिल्याच दिवशी लगोलग हेल्पलाइन क्रमांक देऊन आपल्या हद्दीतील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्याची उत्तम व्यवस्था केली, त्याबद्दल पणजीचे महापौर श्री. उदय मडकईकर खरोखरच अभिनंदनास पात्र आहेत. आम्ही व्यक्तिशः त्यांचे कौतुक केले आहे आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना त्यांचा कित्ता गिरवून संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक नगरपालिका आणि पंचायतक्षेत्रामध्ये घरोघरी जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्यासाठी अशा प्रकारे हेल्पलाईन क्रमांक द्यावा अशी सूचनाही केली आहे. सरकारने राज्यात अराजक निर्माण होऊ नये यासाठी विनाविलंब अशा प्रकारची व्यवस्था जनतेसाठी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आम्ही पुन्हा एकवार करीत आहोत.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि त्यांच्या सरकारची खरी कसोटी आता सुरू झाली आहे. आतापर्यंत तर्कसंगत नसलेले निर्णय मनमानीपणे घेतले गेले. आपलेच निर्णय रातोरात फिरवले गेले. त्यातून अभूतपूर्व गोंधळाची परिस्थिती राज्यात निर्माण झालेली आहे. हा सगळा सावळागोंधळ निस्तरण्याची जबाबदारीही आता सर्वस्वी सरकारची आहे. पुढे जे जे काही घडेल त्याला पूर्णतः राज्य सरकार जबाबदार असेल. जनतेने आपल्या जबाबदारीचे भान ठेवून सरकारला सर्व सहकार्य करावे असे आवाहन आम्ही करतो. कोरोनाचे हे महासंकट आपल्याला लवकरच दूर सारायचे आहे. पुन्हा एकदा नव्या आकांक्षा, नव्या स्वप्नांसह जीवनाला सामोरे जायचे आहे. सध्या आपल्या सर्वांसाठी काळ जणू गोठला आहे. परंतु हेही दिवस जातील. संपेल रात्र संपेल याच विश्र्वासाने येणाऱ्या काळाला विलक्षण संयमाने, शांतपणे सामोरे जाऊया. घरी राहा, काळजी घ्या.
आम्ही आपल्या सोबत आहोत आणि यापुढेही राहू…

संपादक,
दैनिक नवप्रभा